लोणावळ्यात ७४ लाखांचे कोकेन जप्त! खंडाळ्यात अंमली पदार्थांच्या वाहतुकीवर टास्क फोर्सची कारवाई; पनवेलचा २८ वर्षीय तरुण ताब्यात..
लोणावळा : खंडाळा परिसरातील जुन्या पुणे-मुंबई मार्गालगत अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ७४ लाख रुपये किमतीचे १४८ ग्रॅम कोकेन सदृश्य पावडर तसेच १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम २१(क) आणि ८(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनू सिताराम उपाध्याय (वय २८, रा. प्लॉट क्रमांक ४०४, बिल्डिंग क्रमांक ११, गोकूळ कॉम्प्लेक्स को-ऑप. हौसिंग सोसायटी, डेरीवली, पनवेल) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८.५० वाजल्यापासून ७ ऑक्टोबर रोजी पहाटे २.५५ वाजेपर्यंतच्या कालावधीत खंडाळा गावच्या हद्दीत केरावाला सोसायटी ते ३० नंबर गेटदरम्यान जुन्या पुणे-मुंबई मार्गालगत ही कारवाई करण्यात आली. झाडाझुडपांच्या परिसरात, विद्युत पोलपासून सुमारे १० फूट अंतरावर अंधारात संशयित व्यक्ती आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तपासणीदरम्यान संशयिताच्या ताब्यात खाकी रंगाच्या चिकट पट्टीने गुंडाळलेले पॅकेट आढळून आले. त्यामध्ये प्लास्टिकच्या पारदर्शक पिशवीत कोकेन सदृश्य पावडर असल्याचे आढळले. पिशवी व चिकटपट्टीसह या पदार्थाचे वजन १४८ ग्रॅम असल्याचे FIR मध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय १५ हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला आहे.
फिर्यादी पोलीस अंमलदार संतोष कांतीलाल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित तरुण हा सदर अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बाळगून मुंबई ते लोणावळा अशी वाहतूक करीत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२७/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोल्हापूर कृती विभाग, पुणे येथील पोलीस निरीक्षक नितीन बोधे करीत आहेत.

















