पोलीस प्रशासन – पालक व शाळा संस्थेची संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – खोपोली येथील खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या राम हरी धोटे पाटील शिशु मंदिर, खोपोली शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सकाळी शाळा भरताना तसेच दुपारी शाळा सुटताना होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढा , अश्या पालकांच्या आलेल्या तक्रारीनुसार यावर प्रभावी उपाययोजना करणे संदर्भात सोमवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता पोलीस प्रशासन, शाळा संस्था पदाधिकारी , पालक प्रतिनिधी , बस – व्हॅन चालक व सुरक्षा रक्षकांची संयुक्त बैठक पार पडली.
शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तसेच ग्राउंड परिसरात खाजगी बस, स्कूल व्हॅन आणि इतर वाहनांची बेशिस्त पार्किंग होत असल्याने विद्यार्थी, पालक व नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता , यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न खूपच गंभीर बनला होता. याबाबत पालकांकडून वारंवार तक्रारीही करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत वाहतूक कोंडी दूर करण्यासह विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये उपस्थित सर्वांनी महत्वाचे मुद्दे मांडले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोषभाई जंगम , कार्यवाह – श्री. किशोरभाई पाटील , उपाध्यक्ष -श्री. अबू जळगावकर , शाळांचे मुख्याध्यापक – सौ. सुनीता चव्हाण – मुख्याध्यापिका, डॉ. रामहरी धोटे शिशु मंदिर, खोपोली , श्री. कानिफनाथ नाथ गोरे – मुख्याध्यापक, जनता विद्यालय, खोपोली , श्री. गौरव तिवारी – मुख्याध्यापक, प. पू. गगनगिरी महाराज स्कूल, खोपोली , तर इतर प्रमुख उपस्थिती श्रीमती रेश्मा चिमण कांबळे – रायगड जिल्हा महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ( सामाजिक न्याय विभाग ), श्री. आनंद गोपाळे – सामाजिक कार्यकर्ते व पालक प्रतिनिधी , श्री. शैलेश शिंदे – पालक प्रतिनिधी , श्री. वाढवे साहेब – पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस स्टेशन , यावेळी विविध शाळांचे सुरक्षा रक्षक, स्कूल बस व व्हॅन चालक तसेच मोठ्या संख्येने पालक याप्रसंगी उपस्थित होते.यावेळी बैठकीत पुढील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
१) स्वतंत्र पार्किंग व्यवस्था – सर्व स्कूल बस व व्हॅनसाठी ग्राउंड परिसरात स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असून, वाहनांच्या येण्या-जाण्याच्या वेळांचे नियोजन करण्यात येणार आहे.
२) वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था – शाळा भरण्याच्या सकाळी ७.०० ते ८.३० आणि शाळा सुटण्याच्या दुपारी ११.०० ते १२.३० या गर्दीच्या वेळेत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी २ सुरक्षा रक्षक आणि १ ट्रॅफिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. ३) बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई – शाळेच्या परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच बेशिस्त पद्धतीने वाहने पार्क करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
या सकारात्मक बैठकीमुळे शाळेच्या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या बैठकीनंतर पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस प्रशासन, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, शाळा संस्था, पालक प्रतिनिधी तसेच सर्व संबंधितांचे उपस्थित पालकांनी आभार व्यक्त केले.

















