भुशीतील मोतीराम हॉटेलमधील खळबळजनक घटना; खून लपविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर काढून लपविल्याचा पोलिसांचा आरोप; पाच जणांविरुद्ध गुन्हा..
लोणावळा : भुशी गावाच्या हद्दीतील मोतीराम हॉटेलमध्ये १२ बोअर परवानाधारक रायफलमधून गोळी झाडून नातवाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोतीराम रावजी मराठे (वय ८३) यांनी त्यांचा नातू अभय माणिक मराठे (वय ३२, रा. तुळसा निवास, भुशी, लोणावळा) याच्यावर रायफलमधून गोळी झाडल्याचा आरोप असून, या गोळीबारात अभय यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता भुशी गावाच्या हद्दीतील मोतीराम हॉटेलमध्ये ही घटना घडली. आरोपी मोतीराम रावजी मराठे यांनी त्यांच्याकडील परवानाधारक १२ बोअर रायफलमधून गोळी झाडून अभय मराठे यांचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अभय यांच्या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांच्या फिर्यादीत अज्ञात कारणावरून खून केल्याचे नमूद आहे.
घटनेनंतर हा प्रकार लपविण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. मयत अभय मराठे यांचे चुलते हिरामण मोतीराम मराठे (वय ५४), चुलत भाऊ मनोज हिरामण मराठे (वय ३२), कविता हिरामण मराठे (वय ५०) आणि हिरामण मराठे यांची बहीण राजश्री दशरथ पवार (वय ५८) यांनी आपसात संगनमत करून खून लपविण्याच्या उद्देशाने हॉटेलमधील सीसीटीव्ही यंत्रणा काढून टाकल्याचा आरोप आहे.
हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज असलेला डीव्हीआर तसेच सीसीटीव्ही कॅमेरे काढून ते लपवून ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे. या माध्यमातून गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित आरोपींवर करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सदानंद सावंत (वय ३६) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मोतीराम रावजी मराठे, हिरामण मोतीराम मराठे, मनोज हिरामण मराठे, कविता हिरामण मराठे आणि राजश्री दशरथ पवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), २३८, २४१, ३(५) तसेच आर्म्स ॲक्टच्या कलम ३ व २७(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील गुन्ह्याची नोंद ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ४ मिनिटांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली १२ बोअर परवानाधारक रायफल ही पोलिस तपासातील महत्त्वाची बाब असून, घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील करीत आहेत.
अष्ट दिशा 24/7 न्यूज

















