लोणावळा भाजी मार्केटमध्ये कचऱ्याचा डोंगर; पाच-सहा दिवस कचरा न उचलल्याने दुर्गंधीचा त्रास, नगरपालिका-ठेकेदाराच्या कामावर नागरिकांचा सवाल!..
लोणावळा : महात्मा ज्योतिराव फुले मार्केट परिसरात, लोणावळा नगरपालिका कार्यालयासमोर असलेल्या कचराकुंडीत भाजी मार्केटमधील कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत असून, हा कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. कचरा संकलन करणारी गाडी नियमित येत नसल्याने अनेकदा पाच-पाच, सहा-सहा दिवस कचरा तसाच पडून राहत असल्याचा आरोप येथील व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
भाजी मार्केटमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि इतर कचरा निर्माण होतो. मात्र हा कचरा वेळेत उचलला जात नसल्याने कचराकुंडी परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधीमुळे भाजी विक्रेते, हमाल, कष्टकरी तसेच परिसरातील अन्य व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर कचऱ्याच्या दुर्गंधीत व्यवसाय करावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
या परिसरात कष्टकरी आणि हमाल वर्गातील नागरिक जेवण करत असतात. मात्र कचराकुंडीतील दुर्गंधीमुळे जेवण करणेही अवघड होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिलांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, काही महिलांना नाकावर पदर घेऊन भाजी खरेदी करण्याची वेळ येत असल्याचे येथील नागरिक सांगतात.
रात्रीच्या वेळी कचराकुंडी परिसरात भटक्या व्यक्तींकडून अस्वच्छता केली जात असल्याने समस्या आणखी गंभीर होत असल्याचे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कचराकुंडी परिसरात कचऱ्यासोबतच घाण आणि दुर्गंधी वाढत चालली आहे.
दररोज कचरा निर्माण होत असताना तो दररोज उचलण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे की नाही, कचरा संकलनाची गाडी नियमित का येत नाही आणि पाच-सहा दिवस कचरा साचून राहण्याची परिस्थिती का निर्माण होते, असा सवाल आता येथील व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लोणावळा नगरपालिकेने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित कंत्राटदाराला नियमितपणे कचरा उचलण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले मार्केटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी कचरा साचून राहणे ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब असून, प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.
“रोजचा कचरा रोज उचलला जात नसेल तर या कचराकुंडीबाबत कायमस्वरूपी पर्याय नगरपालिका प्रशासनाने शोधावा. दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या वातावरणात व्यवसाय करणे आता कठीण झाले आहे,” अशी भावना येथील व्यावसायिकांनी व्यक्त केली.

















