लोणावळा : बॅटरी हिल, खंडाळा येथील ६२ वर्षीय बाळू वामन गायकवाड हे गेल्या अडीच वर्षांपासून दोन्ही खुब्यांच्या आजाराने त्रस्त होते. दोन्ही खुब्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी तब्बल ७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने गायकवाड कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. मात्र झेन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व जनसेवक शौकत भाई शेख यांच्या पुढाकाराने झेन फाउंडेशन, खंडाळा तसेच स्वाभिमान मेडिकलचे हेड झाहिद भाई खान यांच्या सहकार्याने मुंबईतील भारतीय आरोग्य निधी हॉस्पिटल, जुहू येथे गायकवाड यांच्यावर दोन्ही खुब्यांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
या मदतीबद्दल बाळू गायकवाड यांचा मुलगा रामा बाळू गायकवाड यांनी शौकत भाई शेख यांचे पत्राद्वारे आभार मानले आहेत. त्यांच्या वडिलांच्या दोन्ही खुब्यांच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शौकत भाई शेख, झेन फाउंडेशन आणि स्वाभिमान मेडिकलचे झाहिद भाई खान यांच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य मिळाल्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या आणि कोणताही आर्थिक भार न पडता पूर्ण झाली.
शौकत भाई शेख हे लोणावळा-खंडाळा परिसरातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत सातत्याने मदतीचा हात देत असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. त्यांच्या पुढाकारातून यापूर्वीही अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे. स्वाभिमान मेडिकलच्या माध्यमातून तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने गरजू रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
गरजू व्यक्तीला केवळ आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने शौकत भाई शेख यांच्याकडून लोणावळा आणि खंडाळा परिसरातील नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे महागड्या उपचारांचा खर्च परवडत नसलेल्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळत आहे.
वडिलांची मोठी शस्त्रक्रिया कोणताही आर्थिक भार न पडता पूर्ण झाल्याने गायकवाड कुटुंबाने शौकत भाई शेख, झेन फाउंडेशन आणि स्वाभिमान मेडिकलचे झाहिद भाई खान यांचे मनापासून आभार मानले आहेत. ‘आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि गरीब जनतेची सेवा अशीच सुरू राहो,’ अशी भावना रामा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
अष्ट दिशा 24/7 न्यूज

















