कर्जतमध्ये विविध मागण्या घेऊन ” ५ ऑक्टोबर पासून साखळी उपोषणाला ” सुरुवात !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – गेली अनेक वर्षे ” वारकरी संप्रदाय व कलावंत ” हे शासनाच्या जाचक अटींमुळे मासिक मानधन मिळण्यापासून वंचित आहेत. हजारो अर्ज शासन दरबारी धूळ खात पडले असून प्रतिक्षेत असलेल्या या वारकरी ह भ प व कलावंतांना न्याय देण्यासाठी गेल्यावर्षी देखील उपोषण करूनही अद्यापि कुठलीच दखल न घेता त्यांच्या अर्जाला केराची टोपली दाखविणाऱ्या ” निगरगट्ट ” शासनाच्या विरोधात पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी आज सोमवार दिनांक ०५ ऑक्टोबर २०२६ पासून कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात तालुक्यातील कलावंतांना घेऊन साखळी उपोषणाला राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. संतोषदादा चौधरी व प्रदेश अध्यक्ष मा.श्री. सुनिलभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली आहे.
” राजश्री छत्रपती शाहू महाराज वृद्ध कलावंत योजने ” अंतर्गत फक्त १०० कलावंत दरवर्षी घेण्याच्या जाचक अटीविरुद्ध पोलीस मित्र संघटनेचा लढा,यावेळी आक्रमक झाला आहे. शासन रायगडच्या वृद्ध लोककलावंतांवर अन्याय करत असून रायगड सारख्या सांस्कृतिक जिल्हयात विनेकरी, किर्तनकार , प्रवचनकार , हरीपाठ , काकड आरती , भजन गायक , वृद्ध शाहिर , लोकगायक , वादक, चित्रकार, अश्या हजारों लोककलावंत्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
राज्य सरकारच्या योजनेतील लाडकी बहीण ६ लाख, किसान सन्मान १.१८ लाख पात्र मग वृद्ध कलावंत लाभार्थी फक्त ९०० च का ? असा महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाला पोलीस मित्र संघटनेचे रमेश दादा कदम यांनी ” संतप्त ” सवाल केला असून ही योजना सन १९५४ – ५५ सालापासून सुरु असूनही रायगडमध्ये फक्त ९०० लाभार्थी आहेत , तर ३ हजार अर्ज धूळ खात पडले आहेत. सन २०१९ पासून या योजनेत अनियमितता व भ्रष्टाचार होत असून वंचितांना डावलून , अपात्रांना लाभ मिळत असल्याचा आरोप रमेश दादा कदम यांनी केला आहे.
यावेळी उपोषण वेळी त्यांच्या प्रमुख मागण्या – १) प्रति जिल्हा कलावंतांची १०० ची मर्यादा तात्काळ रद्द करावी. २) सर्व पात्र वृद्ध कलावंतांना ५००० रु. मानधन लागू करावे. ३) ह.भ.प. भिकाजी महाराज पडवळ व ह.भ.प. शिवराम महाराज तुपे यांचे अर्ज तात्काळ मंजूर करावेत. ४) ह.भ.प. भिकाजी महाराज पडवळ व ह.भ.प. शिवराम महाराज तुपे यांना सन २०१९ रोजी अर्ज दाखल केल्यापासून ते आजपर्यंतचा संपूर्ण लाभ देण्यात यावा.
५) सर्व लाभार्थ्यांची सखोल चौकशी करून अपात्र व भ्रष्टाचारावर कायदेशीर कारवाई करावी , अशी मागणी रमेश दादा शांताराम कदम, प्रदेश उपाध्यक्ष, पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली भारत, श्री.ह.भ.प. भिकाजी महाराज पडवळ , कर्जत तालुक्यातील वृद्ध कलावंत, यांनी केली आहे. या साखळी उपोषणाला कर्जत तालुक्यातील ह.भ.प. वारकरी , कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















