लोणावळ्यात माजी नगरसेवकांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; रायफलची साफसफाई करताना अचानक गोळी सुटल्याची प्राथमिक माहिती..

लोणावळा : लोणावळा शहराचे माजी नगरसेवक माणिक मराठे यांचे चिरंजीव अभय मराठे यांचा सोमवारी (५ ऑक्टोबर) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घरातील रायफलची साफसफाई करत असताना अचानक गोळी सुटून ती अभय मराठे यांच्या छातीला लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे मराठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभय मराठे हे त्यांच्या घरातील रायफलची साफसफाई करत असताना अचानक रायफलमधून गोळी सुटली. ही गोळी त्यांच्या छातीमध्ये लागल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. या घटनेची लोणावळा शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. रायफलमधून गोळी नेमकी कोणत्या परिस्थितीत सुटली, घटना कशी घडली आणि या घटनेमागील नेमके कारण काय आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत.

या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या तपासानंतरच घटनेबाबत अधिकृत आणि सविस्तर माहिती समोर येणार आहे.

अभय मराठे यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर लोणावळा शहरात हळहळ व्यक्त होत असून, मराठे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

Views: 708

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick