लोणावळ्यात पार्किंगच्या वादातून तिघांवर बांबू-दगडाने हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल..

लोणावळा : रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंगमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून तरुणांच्या गटावर बांबू आणि दगडाने हल्ला केल्याची घटना लोणावळ्यात समोर आली आहे. या हल्ल्यात सागर युवराज पाटील यांच्यासह त्यांच्या मित्रांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी प्रथमेश (पचू) कदम याच्यासह तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर पाटील हे ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास अनिकेत जाधव आणि शुभम चौगुले यांच्यासोबत टाटा ब्रिजच्या पुढील एका चहाच्या टपरीजवळ थांबले होते. त्यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातील बाजारातील पार्किंगमध्ये झालेल्या आधीच्या बाचाबाचीच्या कारणावरून प्रथमेश कदम व त्याच्यासोबत आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी वाद घातल्याचे पोलिसांच्या माहितीतून समोर आले आहे.

यानंतर आरोपींनी सागर पाटील व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. याचवेळी प्रथमेश कदम याने जवळ पडलेला लाकडी बांबू उचलून सागर पाटील यांच्या हातांवर प्रहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर दगडाने त्यांच्या पायावरही मारहाण करण्यात आली. तसेच अनिकेत जाधव यांच्यावरही बांबूने हल्ला करून त्यांच्या हाताला व पायाला दुखापत केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेनंतर सागर पाटील यांनी लोणावळा शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून प्रथमेश (पचू) कदम आणि त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिसांकडून सुरू आहे.

अष्ट दिशा 24/7 न्यूज

Views: 313

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick