तुंगार्लीतील लगुना रिसॉर्टसमोरील मोकळ्या जागेत कारवाई; मारुती स्विफ्ट कारही पोलिसांच्या ताब्यात..
लोणावळा, दि. ४ : लोणावळा शहरातील तुंगार्ली गावाच्या हद्दीत लगुना रिसॉर्टसमोरील मोकळ्या जागेत अंमली पदार्थ विक्री व सेवन करण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांना लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे ५ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) जप्त केले आहे. या कारवाईमुळे लोणावळा-खंडाळा परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीवर पोलिसांचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दि. ४ ऑक्टोबर रोजी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोसई संदेश चंदनशिव आणि पोशि/८१३ राहुल चोरगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. तुंगार्ली गावाच्या हद्दीत लगुना रिसॉर्टसमोरील मोकळ्या जागेत अंदाजे पाच फूट चार इंच उंची असलेला मयुर निवृत्ती गोणते हा त्याच्या साथीदारांसह अंमली पदार्थ विक्री व सेवन करण्यासाठी मारुती स्विफ्ट कार क्रमांक एमएच १४ बीसी ९६३१ मधून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे मयुर निवृत्ती गोणते (रा. ओळकाईवाडी, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे), दिनेश शशिकांत दळवी (रा. ओळकाईवाडी, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे), मंगेश रमेश लोखंडे (रा. ओळकाईवाडी, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) आणि दत्ता संजय बेदरकर (रा. स्वराज्य नगरी, बारा बंगला, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) अशी आहेत.
मिळालेल्या माहितीची खात्री करून लोणावळा शहर पोलिसांचे पथक तात्काळ संबंधित ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी कारवाई करत मयुर निवृत्ती गोणते याच्यासह दिनेश शशिकांत दळवी, मंगेश रमेश लोखंडे आणि दत्ता संजय बेदरकर या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण ५ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले.
या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाबाबत तसेच त्याच्या विक्री व सेवनाच्या उद्देशाबाबत पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई संदीपसिंह गिल, सहायक पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, शुभम कुमार, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, गजानन टोम्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा उपविभाग आणि सचिन पाटील, पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोसई संदेश चंदनशिव, पोहवा मयुर अबनावे, पोहवा शशिकांत खोपडे, पोहवा विष्णु फटांगडे, पोशि धनंजय आगवणे, पोशि राहुल चोरगे, पोशि अंकुश पाटील, पोशि स्वप्निल पाटील, पोशि निलेश सोनवणे आणि पोशि तुषार शिंदे सहभागी होते.
दरम्यान, लोणावळा-खंडाळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी कोणत्याही प्रकारच्या मॅफेड्रॉन (एमडी) अथवा इतर अंमली पदार्थांचे सेवन करू नये, असे आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे. तसेच परिसरात कोणी अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी अथवा पर्यटकांनी तात्काळ ११२ क्रमांकावर किंवा लोणावळा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

















