सुनील तटकरे यांची पेट्रोलियम व नैसर्गिक वायू समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड; सुधाकर घारे यांच्याकडून अभिनंदन..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे -राज्याचे ज्येष्ठ नेते , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार ” श्री.सुनिल तटकरे साहेब ” यांची भारत सरकारच्या ” पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीच्या ” अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी अभिनंदन केले आहे.
सुनील तटकरे यांचा राजकीय प्रवास खूपच संघर्षमय पहाण्यास मिळतो. राजकारणाचे व सामाजिक कार्याचे बाळ कडू त्यांना त्यांचे वडील दत्तात्रेय तटकरे यांच्या कडूनच मिळाले.राष्ट्रीय काँग्रेस पक्षापासून त्यांचा राजकीय प्रवास रोहा तालुक्यातून सुरू झाला. प्रथम ते युवक काँग्रेसचे रोहा तालुका अध्यक्ष झाले. रोहा तालुका अध्यक्ष , रोहा – माणगाव मतदार संघ अध्यक्ष , जिल्हा अध्यक्ष असा प्रवास करताना त्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत केला. सन ९० साली ते रोहा माणगाव विधानसभेसाठी उमेदवारी घेऊन उभे राहिले , मात्र त्यावेळी शेकाप कडून त्यांचा पराभव झाला. पराभवाला न डगमगता त्यांनी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करून जिल्हा परिषदेवर निवडून जाऊन राजिप चे अध्यक्ष झाले.
तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेबांचे निकटवर्तीय असल्याने पुन्हा एकदा १९९५ साली त्यांना रोहा – माणगाव मतदार संघातून विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करून संधी देण्यात आली. यावेळी ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले व आमदार झाले. त्यानंतर सलग ३ वेळा ते आमदार झाले. २००९ साली ते श्रीवर्धन मतदार संघातून निवडून आले. मग खासदारकीचा प्रवास त्यांचा सुरू झाला. रायगड मतदार संघातून ते लोकसभेसाठी आजमितीस ३ वेळा निवडून आले आहेत. आजही त्यांची मुलगी मंत्री आदिती तटकरे या रोहा – माणगाव – श्रीवर्धन मतदार संघातून २ वेळा निवडून आल्या आहेत , तर अनिकेत भाई तटकरे हे दुसऱ्यांदा विधान परिषदेवर बिनविरोध निवडून येऊन आमदार आहेत.
रायगडचा त्यांनी सर्व क्षेत्रात विकास करून ” कोकणचे भाग्यविधाते ” म्हणून त्यांची कार्यकिर्द चांगलीच गाजली. खूप विकासकामे त्यांनी आजवर केली असून आजवरच्या राजकीय प्रवासात त्यांनी पाटबंधारे , ऊर्जा , महसूल , नगरविकास , अश्या मंत्रिपदाचा पदभार सांभाळला , तर रायगडचे पालकमंत्री देखील ते झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या अकाली निधनानंतर ते ” प्रदेशाध्यक्ष ” म्हणून उत्तम रितीने कार्यभाग सांभाळत असून पक्षाला राज्यात उपमुख्यमंत्री पद आहे.
राष्ट्रीय राजकारणात दांडगा अनुभव , अभ्यासु नेतृत्व म्हणून मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे भारत सरकारच्या ” पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीच्या ” अध्यक्षपदी गत वेळेला त्यांची नियुक्ती केली होती , आता पुन्हा एकदा त्यांच्यावर तीच जबाबदारी दिली असून त्यांच्या या फेर निवडीमुळे राष्ट्रवादीत उत्साहाचे वातावरण असून रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी प्रदेशाध्यक्ष , खासदार सुनील तटकरे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

















