ठाकूरसईत पत्नीचा दगडाने खून; चार तासांच्या थरारक पाठलागानंतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात..

मावळ : दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्यानंतर घनदाट जंगलात पसार झालेल्या आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चार तासांच्या थरारक पाठलागानंतर ताब्यात घेतले. मावळ तालुक्यातील ठाकूरसई येथे ही घटना घडली. तुकाराम वसंत पवार असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी ठाकूरसई, ता. मावळ, जि. पुणे, पवनानगर परिसरात पत्नीचा खून करून आरोपी जंगलाच्या दिशेने पसार झाल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तत्काळ चार पथके तयार केली.

आरोपी घनदाट जंगलात पळून गेल्याने पोलिसांसमोर त्याला शोधून ताब्यात घेण्याचे आव्हान होते. पोलिसांच्या पथकांनी परिसरात शोधमोहीम राबवत आरोपीचा माग काढला. सुमारे चार तासांच्या पाठलागानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भूषण माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, मावळ तालुक्यात अवैध दारू विक्री आणि नशेच्या पदार्थांच्या सेवनातून घडणाऱ्या गंभीर घटनांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मागील आठवड्यात, २१ सप्टेंबर रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुसगाव येथेही पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर काही दिवसांतच ठाकूरसई येथे अशाच स्वरूपाची घटना घडल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे, अवैध दारू विक्री व निर्मितीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून, या कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी भूषण माने यांनी सांगितले.

दारूसह गांजा आणि इतर अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधातही पोलिसांकडून कारवाई सुरू असून, अशा अवैध धंद्यांमुळे कुटुंबांवर गंभीर परिणाम होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले. या कारवाईला नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Views: 176

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick