मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ताजे गावाजवळील घटना; कामशेत पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू..
कामशेत : पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कॅबचालकाला शस्त्राचा धाक दाखवून पैसे मागत त्याच्यावर मारहाण करण्यात आल्याची घटना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मावळ तालुक्यातील ताजे गावाजवळ घडली. यानंतर चालकाला जबरदस्तीने कॅबच्या मागील सीटवर बसवून त्याची कॅब सुमारे पाच किलोमीटर पुढे नेण्यात आली. कामशेत बोगद्याजवळ चालकाला रस्त्यावर सोडून देत तिघे जण कॅब आणि मोबाईल घेऊन पुण्याच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी कामशेत पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथील २३ वर्षीय चालक हा पुणे-मुंबई दरम्यान कॅब सेवा देतो. बुधवारी पहाटेच्या सुमारास तीन जणांनी पुण्याला जाण्यासाठी त्याची कॅब घेतली होती. कॅब ताजे गावाच्या हद्दीत पोहोचली असता, पहाटे सुमारे १.३० वाजता तिघांनी चालकाला शस्त्राचा धाक दाखवत पैशांची मागणी केली.
चालकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिघांनी कॅब थांबवून त्याला मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर चालकाला जबरदस्तीने मागील सीटवर बसवण्यात आले आणि त्यापैकी एकाने कॅबचा ताबा घेतला. यावेळी चालकाचा आरोपींसोबत झटापट झाली. त्यात चालकाच्या पोटाला दुखापत झाली.
यानंतर आरोपींनी कॅब सुमारे पाच किलोमीटर पुढे चालवत नेली. कामशेत बोगद्याजवळ चालकाला रस्त्यावर सोडून देण्यात आले. त्याच्याकडील मोबाईल फोनही घेण्यात आला आणि तिघे आरोपी कॅब घेऊन पुण्याच्या दिशेने निघून गेले.
कॅबमधून खाली उतरवल्यानंतर चालकाने दुसऱ्या वाहनाकडून मदत घेत टोल नाक्यापर्यंत पोहोचला. तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कामशेत पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. चालकाच्या दुखापती गंभीर नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कामशेत पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून द्रुतगती मार्गावरील टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील तसेच पुण्याबाहेरील टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेनंतर कॅब आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

















