लोणावळा : रायवूड परिसरातील ऑक्सिलियम शाळेजवळ बीएसएनएलकडून फायबर केबल टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी रस्ता खोदण्यात आल्याने पावसाच्या पाण्यामुळे खोदलेल्या भागात मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, पालक, नागरिक आणि पर्यटकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
रायवूड परिसरात ऑक्सिलियम शाळा, रायवूड इंटरनॅशनल स्कूल आणि शांतीसदन शाळा आहेत. त्यामुळे या मार्गावर सकाळ-संध्याकाळ शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शाळेच्या बसेस तसेच आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणारे पालक याच मार्गाचा वापर करतात. त्यातच भुशी धरणाकडे जाणारा हा मार्ग असल्याने पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते.
फायबर केबल टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर झालेल्या खोदकामाच्या ठिकाणी चिखल साचत आहे. वाहनांची ये-जा सुरू असताना चिखल पादचाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर उडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना या चिखलातून मार्ग काढत जावे लागत असल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, खोंडगेवाडी परिसरातील रस्त्याच्या वळणावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास होत असून, नागरिकांनी वाहनचालकांचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यांमध्ये टायर ठेवले आहेत. मात्र, टायर ठेवणे हा कायमस्वरूपी उपाय नसून संबंधित प्रशासनाने या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

विकासकामे आवश्यक, मात्र नागरिकांची गैरसोय टाळणेही गरजेचे..
फायबर केबलचे काम हे आवश्यक विकासकाम असले तरी, काम सुरू असताना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी घेणे संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. विशेषतः शाळांच्या परिसरातील रस्त्यावर विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी वर्दळ असल्याने कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि व्यवस्थित मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
रस्ता खोदल्यानंतर पावसाळ्यात चिखल निर्माण होणार हे अपेक्षित असताना त्यावर तात्पुरती उपाययोजना करणे गरजेचे आहे. काम लवकर पूर्ण करून रस्ता पूर्ववत करावा, तसेच खोंडगेवाडीतील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“विकासकामांना आमचा विरोध नाही; मात्र विकासकामांमुळे नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे. विशेषतः शाळकरी मुलांचा हा मार्ग असल्याने संबंधित यंत्रणांनी कामाची गती वाढवून रस्त्याची योग्य व्यवस्था करावी,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.

















