लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची विशेष मोहीम; कर्णकर्कश सायलेन्सर, ब्लॅक फिल्म, हेल्मेट व सीटबेल्ट नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५१ वाहनचालकांवर कारवाई, ५४ हजार ५०० रुपयांचा दंड.
लोणावळा : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकली, वाहनांच्या काचांना ब्लॅक फिल्म लावणे, हेल्मेटचा वापर न करणे तसेच चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणे अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५१ वाहनचालकांवर लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेने कारवाई केली. या कारवाईत संबंधित वाहनचालकांना एकूण ५४ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला.
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकली, वाहनांच्या काचांवर अनधिकृत ब्लॅक फिल्मचा वापर, दुचाकी चालविताना हेल्मेट न वापरणे आणि चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणे अशा प्रकारांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५१ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून एकूण ५४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
रस्त्यावरील शिस्त राखणे, ध्वनिप्रदूषणाला आळा घालणे आणि वाहनचालकांसह इतर नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा या कारवाईमागील उद्देश आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध यापुढेही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले.
ही कारवाई लोणावळा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक भूषण माने, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया मेत्रे, पोलीस हवालदार भूषण कदम (बक्कल क्रमांक १३७४), पोलीस हवालदार विनोद गवळी (बक्कल क्रमांक २२७७), पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुदळे, यश देसाई तसेच पोलीस मित्र अनिल लोंढे, विनोद विकारी, विक्रम येवले व वाजे यांनी केली.
वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, दुचाकी चालविताना हेल्मेटचा आणि चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करावा, वाहनांच्या काचांवर अनधिकृत ब्लॅक फिल्म लावू नये तसेच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर टाळावा, असे आवाहन लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेने केले आहे.

















