जयभीम नगरमध्ये विश्वशांती बुद्धविहाराच्या वास्तूचे भूमिपूजन उत्साहात संपन्न..

महाडच्या चवदार तळ्याचे पवित्र जल आणून कलशपूजन; बुद्धविहाराच्या उभारणीसाठी दोन मान्यवरांकडून ७ लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा..

वाकसई : जयभीम नगर, वाकसई येथे विश्वशांती बुद्धविहाराच्या नूतन वास्तूचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार, दि. ३० रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जनसेवा मित्र मंडळ, रमामाई महिला मंडळ आणि विश्वशांती बुद्धविहार समिती, वाकसई यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावरून कलशपूजनासाठी आणण्यात आलेले जल. जयभीम नगरच्या वतीने हे जल आणण्यात आले होते. त्यानिमित्ताने कलशाची फटाक्यांच्या आतषबाजीत आणि डी.जे. च्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत परिसरातील आंबेडकरी अनुयायी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शन सभा पार पडली.त्यानंतर भंतेजी महेंद्र बोधी यांच्या हस्ते कलश पूजन करून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत बुद्धविहाराच्या उभारणीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळालेल्या २५ लाख रुपयांच्या निधीबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रतीक सुरेश देसाई यांनी बुद्धविहाराच्या नूतन वास्तूच्या कामासाठी ५ लाख रुपये, तर सामाजिक कार्यकर्ते अनिल भिवराम देसाई यांनी वैयक्तिक स्वरूपात २ लाख रुपये देण्याची घोषणा केली. बुद्धविहाराच्या उभारणीसाठी जाहीर करण्यात आलेल्या या ७ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीबद्दल विश्वशांती बुद्धविहार समिती आणि उपस्थित मान्यवरांच्या वतीने दोघांचेही आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद पुणेच्या सभापती दीपाली दीपक हुलावळे, पंचायत समिती मावळच्या सदस्य रेश्मा राजू देवकर, पंचायत समिती सदस्य समीर (आण्णा) जाधव यांच्यासह आंबेडकरी अनुयायी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच ग्रुप ग्रामपंचायत वाकसई परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी विश्वशांती बुद्धविहार समितीचे अध्यक्ष विजय गोपाळराव देसाई, उपाध्यक्ष अरुण सोमाजी देसाई, सचिव बाळू शिवराम देसाई आणि खजिनदार ज्ञानेश्वर नामदेव देसाई यांच्यासह जयभीम नगरमधील कार्यकर्त्यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान केला. परिसरातील सामाजिक व धार्मिक एकोप्याचे प्रतीक ठरणाऱ्या या बुद्धविहाराच्या भूमिपूजन सोहळ्याला मोठा प्रतिसाद लाभला.

Views: 221

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick