पुणे जिल्हा पोलीस सोसायटीच्या संचालकपदी महेश गायकवाड बिनविरोध..

पोलीस सेवेत उल्लेखनीय कामगिरी, आता सहकार क्षेत्रात नवी जबाबदारी !

पुणे : दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकपदी पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत सर्वसाधारण गटातून त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने ही निवड करण्यात आली.

२० जून १९२० रोजी स्थापन झालेल्या या सहकारी संस्थेचे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण यांसह विविध पोलीस विभागांतील सुमारे १५ हजार १९३ सभासद आहेत. संस्थेचे अधिकृत भागभांडवल सुमारे ३३० कोटी रुपये असून वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ३ हजार २०० कोटी रुपये आहे. सभासदांसाठी २० लाख रुपयांचे अपघात विमा सुरक्षा कवच आणि तीन लाख रुपयांची कॅशलेस विमा पॉलिसी असे उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात.

संस्थेच्या १३ संचालकांपैकी एका संचालकाचे सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी अध्यासी अधिकारी सुभाष काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. संस्थेचे अध्यक्ष अनिल भोंग, उपाध्यक्ष सुमित कदम, खजिनदार दिनेश गडांकुश, सचिव जमीर तांबोळी यांच्यासह संचालक मंडळातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महेश गायकवाड हे सध्या दहशतवादविरोधी पथकात (एटीएस) कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर क्राइम विभागात काम करताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या पोलीस सेवेची दखल घेत त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आले आहे.

गायकवाड यांचा पोलीस दलातील अनुभव, प्रशासकीय कामकाजाची जाण आणि सहकारी संस्थेच्या कार्याप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेता त्यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष अनिल भोंग यांनी सांगितले. या निवडीमुळे संस्थेच्या कामकाजाला गती मिळण्यासह सभासदांच्या आर्थिक हिताचे संरक्षण आणि पारदर्शक कारभाराला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या निवडीबद्दल पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार, संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि मित्रपरिवाराकडून महेश गायकवाड यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासह सभासदांच्या हक्कांसाठी प्रामाणिक आणि गतिमान प्रशासन देण्याची ग्वाही गायकवाड यांनी दिली.

Views: 68

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick