२ ऑक्टोबरच्या जीवघेण्या अपघातानंतरही आरपीटीएससमोरील अवजड वाहनांचे पार्किंग सुरूच!सोमवारी एकाच ठिकाणी तीन मोठी वाहने उभी; अपघाताचा धोका कायम. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी!
लोणावळा : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा-खंडाळा दरम्यान आरपीटीएससमोर रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. २ ऑक्टोबर रोजी याच परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता, तर दोघे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतरही संबंधित ठिकाणी अवजड वाहने उभे करण्याचे प्रकार सुरूच असल्याने लोणावळेकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
२ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास आरपीटीएस आणि राज ढाब्यासमोर दुचाकी, रिक्षा आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या क्रेनचा अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीवरील २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. या घटनेनंतर महामार्गालगत बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
मात्र, अपघाताच्या घटनेनंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही. सोमवारी (२६ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास आरपीटीएससमोर एकाच वेळी तीन मोठे अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसून आले. महामार्गावरून वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे समोरील परिस्थितीचा अंदाज घेण्यात अडचण येऊ शकते. विशेषतः समोरून येणारी वाहने आणि रस्त्यावरील इतर अडथळे वेळीच न दिसल्यास गंभीर अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. अशा वर्दळीच्या रस्त्यावर अवजड वाहने बेशिस्तपणे उभी करणे वाहनचालकांसह अन्य प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे संबंधित ठिकाणी अवजड वाहने उभी करणाऱ्या चालकांवर वाहतूक कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासनाने जागे व्हायचे का, असा सवालही उपस्थित होत आहे. आरपीटीएससमोरील या ठिकाणी पोलिसांनी नियमित गस्त ठेवावी, बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात या ठिकाणी अवजड वाहने उभी राहणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लोणावळेकरांकडून केली जात आहे.

















