पहाटेच्या सुमारास चोरट्यांचा डाव! घराची कडी उघडून थेट देव्हाऱ्यासमोरील दागिन्यांवर हात साफ; मंगळसूत्र, राणीहार, सोन्याच्या चेनसह १४ लाखांचा ऐवज लंपास..
लोणावळा : लोणावळ्यातील गवळीवाडी परिसरातील देवकीनंदन अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्याने घराच्या बाहेरून लावलेली कडी उघडून घरात प्रवेश केला. घरातील देव्हाऱ्यासमोरील चौरंगावर ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १४ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी निलम सूर्यकांत कदम (वय ३५, रा. देवकीनंदन अपार्टमेंट, गवळीवाडी, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.४५ ते सकाळी ७.३० या वेळेत ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या बाहेरून लावलेली कडी उघडून घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर किचनमधील देव्हाऱ्यासमोर चौरंगावर ठेवलेले सोन्याचे विविध दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.
चोरीला गेलेल्या ऐवजात ८ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ४ तोळे ५ ग्रॅम वजनाचा राणीहार, १ तोळा २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोपर, कानातील सोन्याचे टॉप्स आणि झुमके, दोन सोन्याच्या चेन तसेच एकूण २ तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे. याशिवाय २५ हजार ५०० रुपये रोख रक्कमही चोरीला गेली आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत १४ लाख ५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंदनशिव करीत आहेत.
अष्ट दिशा 24/7 NEWS

















