ओळखपत्र मागण्यावरून वादाचे हाणामारीत रूपांतर; महिला आणि पुरुष गंभीर जखमी, १५ ऑगस्टला गुन्हा दाखल..
लोणावळा : १४ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी १५ ऑगस्ट रोजी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण येथून एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळ्यात आलेल्या एका कुटुंबासोबत हॉटेलमध्ये वाद होऊन मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हॉटेल चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेत एक महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील खोणी गावातील हे कुटुंब एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळ्यात आले होते. दर्शनानंतर ते एका हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेलची रूम खाली केल्यानंतर हॉटेल चालकाने कुटुंबीयांकडे ओळखपत्राची मागणी केली. याच मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला.
वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित कुटुंबीयांच्या आरोपानुसार, हॉटेल चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. या मारहाणीत एक महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मारहाणीच्या वेळी आरोपींकडून आगरी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली तसेच शिवीगाळ करण्यात आल्याचाही आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी पीडित कुटुंबीयांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे.

















