21 वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाला आणखी किती प्रतीक्षा? आश्वासनांपेक्षा आता पूर्णत्वाची निश्चित तारीख जाहीर करण्याची गरज!
लोणावळा : शहरातील नांगरगाव-भांगरवाडी दरम्यानचा बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाणपूल गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. वाहतूक कोंडी आणि भांगरवाडी रेल्वे फाटकामुळे होणारा नागरिकांचा खोळंबा दूर करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या या पुलाचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. तब्बल 21 वर्षांपूर्वी, 2005 मध्ये लोणावळा नगरपरिषदेने पुलाच्या उभारणीचा ठराव केला होता. प्रत्यक्ष बांधकामाला ऑगस्ट 2019 मध्ये सुरुवात झाली. मात्र, विविध अडचणींमुळे कामाला वारंवार विलंब होत गेला.
भांगरवाडी रेल्वे फाटक हे लोणावळा शहरातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरून रेल्वे येताच फाटक बंद केले जाते. त्यामुळे नांगरगाव, भांगरवाडी आणि परिसरातील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अनेकदा फाटक बराच वेळ बंद राहत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे उड्डाणपूल पूर्ण होण्याची नागरिकांची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढत आहे.
या प्रकल्पाच्या विलंबामागे भूसंपादन हा प्रमुख अडथळा राहिला. पुलाच्या दोन्ही बाजूंची आवश्यक जागा ताब्यात न आल्याने कामाला अडथळे निर्माण झाल्याचे आमदार सुनील शेळके यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. भूसंपादनासाठी सुमारे 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातही या कामाचा आढावा घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, नांगरगाव बाजूला रेल्वे पुलाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या इमारतीच्या बांधकामाचा मुद्दाही चर्चेत आला होता. प्रस्तावित उड्डाणपुलाच्या परिसरात या इमारतीच्या बांधकामाला परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे पुलाच्या नियोजनाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, आता उड्डाणपुलाचा मार्ग या इमारतीच्या बाजूने वळवण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापूर्वी चर्चेत आलेल्या इमारतीच्या बांधकामाचा आणि उड्डाणपुलाच्या मार्गातील बदलाचा नेमका संबंध काय, तसेच हा बदल कोणत्या निर्णयानुसार करण्यात आला, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टता अपेक्षित आहे.
मात्र, मे 2026 मध्ये या प्रकल्पाबाबत प्रशासनाकडून सकारात्मक माहिती देण्यात आली. पुलाच्या कामातील तांत्रिक अडथळे दूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. उपनगराध्यक्ष देविदास कडू यांनी पुढील सहा ते आठ महिन्यांत पुलाचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा विश्वास व्यक्त केला होता. काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले.
मात्र, ऑगस्ट महिना सुरू झाला असून नागरिकांसाठी पूल अद्याप खुला झालेला नाही. त्यामुळे मे महिन्यात तांत्रिक अडथळे दूर झाल्याचे सांगितल्यानंतर गेल्या काही महिन्यांत प्रत्यक्ष काम किती पुढे गेले, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती देणे गरजेचे आहे.
2005 मध्ये ठराव, 2019 मध्ये प्रत्यक्ष काम आणि त्यानंतर सातत्याने विलंब, अशी या पुलाची आतापर्यंतची वाटचाल आहे. नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीशी थेट संबंधित असलेला हा प्रकल्प आता केवळ घोषणा आणि आश्वासनांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
उड्डाणपूल पूर्ण झाल्यास भांगरवाडी रेल्वे फाटकावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. नांगरगाव, भांगरवाडी तसेच परिसरातील नागरिकांना शहरातील इतर भागात जाण्यासाठी अधिक सुलभ मार्ग उपलब्ध होईल. त्यामुळे उड्डाणपूल नेमका कधी वाहतुकीसाठी खुला होणार, याची निश्चित तारीख प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

















