रायवूडच्या बंगल्यात २५-३० सुरक्षा कर्मचारी अचानक घुसले; महिलांना मारहाण, २८ जणांवर गुन्हा..

शंभर वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या देशमुख कुटुंबाच्या खोलीत घुसल्याचा आरोप; तोडफोडीनंतर नगरसेवकांना दमदाटी, गुन्हा दाखल करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे ठिय्या आंदोलन.

लोणावळा : रायवूड येथील ‘लाल चिमणी’ बंगल्यात सोमवारी सकाळी अचानक मोठ्या संख्येने खासगी सुरक्षा कर्मचारी दाखल झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. बंगल्याच्या परिसरात शंभर वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या देशमुख कुटुंबाच्या खोलीत २५ ते ३० सुरक्षा कर्मचारी घुसल्याचा आरोप असून, यावेळी दोन महिलांना मारहाण, घरातील साहित्याची फेकाफेक आणि बंगल्याच्या आवारातील पाण्याची मोटर, पाईप तसेच झाडांचे नुकसान केल्याची तक्रार आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी २८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

देशमुख कुटुंबीय अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास असून, बंगला मालक आणि त्यांच्यातील संबंध चांगले असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या घटनेनंतरही देशमुख कुटुंबीयांनी बंगला मालकाविरोधात पोलिसांत तक्रार केलेली नाही. त्यामुळे अचानक एवढ्या मोठ्या संख्येने खासगी सुरक्षा कर्मचारी बंगल्यात का दाखल झाले, यामागील नेमके कारण काय, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगला मालकाने सुमारे दोन महिन्यांपूर्वी बंगल्याच्या ठिकाणी सात ते आठ खासगी सुरक्षा कर्मचारी ठेवले होते. मात्र सोमवारी सकाळी अचानक २५ ते ३० जणांचा समूह तेथे दाखल झाल्याचा आरोप आहे. हे कर्मचारी गणवेशात असल्याचेही सांगण्यात येत आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, सोमवारी (दि. १७) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कुरवंडे ते जुना खंडाळा मार्गावरील रायवूड येथील ‘लाल चिमणी’ बंगल्यातील देशमुख यांच्या खोलीसमोर हा प्रकार घडला. मनीषा मनोहर देशमुख (वय ५२) यांनी याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, मनीषा देशमुख आणि त्यांची जाऊ राजश्री राजू देशमुख या खोलीत असताना राजू नागनाथ विरकर, साईनाथ सुनील धोत्रे, आम्रपाली राम सूर्यवंशी, भाग्यश्री श्रीमंत कसबे, आयोध्या सुभाष कांबळे, हमा किसन गोसावी, सोनाली विजय तुपसुंदर, पल्लवी प्रसाद सोहणे, कामेश्वरी माधवन आरमुगम, पंकज साहेबराव शिंदे, सनी अरुण भसे, अनिता विकी भडकवाड, वहिता शेख, मंदाकिनी शिवाजी पवार, कल्पना प्रमोद सोनकांबळे आणि वर्षा राजेंद्र लोखंडे यांच्यासह १० ते १२ अनोळखी व्यक्ती तेथे आल्याचे नमूद आहे.

या जमावाने घरात प्रवेश करून दोन्ही महिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. घरातील भांडी आणि अन्य साहित्य बाहेर फेकण्यात आले. बंगल्याच्या आवारातील पाण्याच्या टाकीचे पाईप, पाण्याची मोटर, केळीची झाडे आणि इतर झाडांचेही नुकसान करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नगरसेवक धनंजय वसंत काळोखे हे घटनास्थळी गेले. त्यावेळी त्यांच्याशी आरोपींनी आरेरावीची भाषा वापरून दमदाटी केल्याचा आरोप आहे.

यानंतर नगराध्यक्षांसह १० ते १५ नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांनी लोणावळा शहर पोलीस ठाणे गाठले. संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मात्र कारवाईला विलंब होत असल्याचा आरोप करत दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नगरसेवकांनी पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले.

यावेळी पोलीस आणि लोकप्रतिनिधींमध्ये शाब्दिक वादही झाला. गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका नगरसेवकांनी घेतली. दरम्यान, प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेले पोलीस निरीक्षक सचिन पाटील हे परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलीस ठाण्यात दाखल झाले.

घटनेचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेतल्यानंतर सायंकाळी साडेसहानंतर २८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात काही महिला सुरक्षा कर्मचारी असल्याची माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, बंगल्यात दाखल झालेल्या या खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक कोणत्या सुरक्षा संस्थेमार्फत करण्यात आली होती, संबंधित कंपनीची कागदपत्रे काय आहेत, तसेच त्यांना त्या ठिकाणी नियुक्त करण्याची अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाली होती का, याचीही पोलिसांकडून पडताळणी सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात सुरक्षा कंपनीची भूमिका आणि कर्मचाऱ्यांची अधिकृत नियुक्ती हा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे.

या प्रकरणात कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना दिली. बंगल्यात एवढ्या मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी नेमके कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या कारणासाठी दाखल झाले, यासह संपूर्ण घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.

Views: 91

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick