लोणावळा : रायवुड परिसरातील एका बंगल्यात पिढ्यान्पिढ्या माळी म्हणून काम करणाऱ्या पांडुरंग देशमुख यांच्या कुटुंबाला कोणताही मोबदला न देता जबरदस्तीने खोली खाली करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तब्बल २५ ते ३० बाऊन्सर बंगल्यात घुसून देशमुख कुटुंबाचे सामान बाहेर काढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच खंडाळ्याचे नगरसेवक धनंजय काळोखे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पांडुरंग देशमुख यांचे कुटुंब कित्येक वर्षांपासून, पिढ्यान्पिढ्या या बंगल्यात माळी म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अचानक मोठ्या संख्येने बाऊन्सर बंगल्यात दाखल झाले आणि देशमुख कुटुंबाला खोली खाली करण्यास सांगत सामान बाहेर काढण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या नगरसेवक धनंजय काळोखे यांनी बाऊन्सरना, “तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून बंगला खाली करत आहात?” असा सवाल केला. यावेळी त्यांच्याशी अरेरावी करण्यात आल्याचा आरोप आहे. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून काळोखे यांनी तत्काळ ११२ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. “पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यामुळे देशमुख कुटुंबाचा जीव वाचला,” असे नगरसेवकांकडून सांगण्यात आले. पोलिस दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगण्यात आले.
यानंतर नगरसेवक धनंजय काळोखे, निखिल कवीश्वर, मुकेश परमार, जीवन गायकवाड, मंगेश मावकर तसेच नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी लोणावळा शहर पोलिस ठाणे गाठले. देशमुख कुटुंबावर झालेल्या कथित प्रकाराची माहिती पोलिसांना देत संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
मात्र, पांडुरंग देशमुख तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर “तुमच्याकडे काय पेपर आहेत, ते घेऊन या,” असे पोलिसांनी सांगितल्याचा आरोप नगरसेवक निखिल कवीश्वर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या मुद्द्यावरून नगरसेवक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचेही सांगण्यात आले.
देशमुख यांची तक्रार तातडीने दाखल करून घेण्याची मागणी करण्यात आली. मात्र, पोलिसांकडून “अर्ध्या तासाने गुन्हा दाखल करू,” असे सांगण्यात आल्याचा दावा नगरसेवकांनी केला.
या प्रकारानंतर नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन केले. “लोणावळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनाच प्रथमच पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली असेल, तर सामान्य नागरिकाने न्यायासाठी कुठे दाद मागायची?” असा सवाल या घटनेनंतर शहरात उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबाच्या तक्रारीवर पोलिस काय कारवाई करतात आणि संबंधित बाऊन्सर तसेच बंगला प्रशासनाची भूमिका काय आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणातील संबंधितांची अधिकृत बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

















