लोणावळा : शहरातील महात्मा ज्योतिराव फुले भाजी मार्केट परिसरातील कचराकुंडीची अवस्था अत्यंत गंभीर झाली असून, भाजी विक्रेते आणि आजूबाजूच्या दुकानदारांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. भाजी मार्केटमधून निघणारा भाजीपाला आणि अन्य कचरा याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याने कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. त्यातच जनावरांचा मुक्त वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या परिसरात गोरगरिबांना स्वस्त दरात जेवण देणारे ‘हमाल पंचायत कष्टकरी भाकर’ हे उपाहारगृह आहे. मात्र, त्याच्या आसपासच मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या दुकानदारांना तोंडाला रुमाल बांधून व्यवसाय करण्याची वेळ आली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कचरा गाडीही नियमित येत नसल्याची तक्रार..
कचरा उचलण्यासाठी येणारी गाडी दोन-दोन, तीन-तीन दिवस येत नाही, तर कधी तब्बल चार दिवस कचरा उचलला जात नसल्याची तक्रार परिसरातील व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे कचराकुंडी भरून कचरा बाहेर पडतो आणि कचऱ्याचे ढिगारे दुकानांपर्यंत येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पावसामुळे हा कचरा अधिक कुजत असल्याने दुर्गंधीचा त्रास आणखी वाढला आहे.
कचरा उचलण्यासाठी कर्मचारी आल्यानंतरही संपूर्ण कचरा उचलला जात नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कचऱ्याचा काही भाग उचलून परिसर स्वच्छ केल्याचे छायाचित्र काढून पाठविले जाते; मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात कचरा घटनास्थळीच शिल्लक राहतो.
दरम्यान, साचलेल्या कचऱ्यावर जनावरे येत असल्याने भाजी विक्रेते आणि ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. विशेषतः भाजी विक्रीसाठी येणाऱ्या महिलांना या कचऱ्याचा आणि जनावरांच्या वावराचा त्रास सहन करावा लागत आहे. जनावरांकडून अचानक हल्ला होण्याची शक्यताही असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
एकीकडे ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला जात असताना लोणावळ्याच्या मध्यवर्ती भाजी मार्केट परिसरातच कचऱ्याचे ढिगारे आणि दुर्गंधी का? ही कचराकुंडी बंद का केली जात नाही, ती बंद करण्यास नेमकी अडचण काय आहे आणि कचरा उचलण्याची व्यवस्था नियमित का केली जात नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने केवळ कचरा उचलून छायाचित्रे काढण्यापेक्षा या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, कचरा संकलनाची गाडी नियमित पाठवावी आणि भाजी मार्केट परिसराची स्वच्छता राखावी, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे.

















