स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीत लोणावळ्यात पर्यटकांचा महापूर; भुशी धरणाच्या पायऱ्याही गर्दीने झाकल्या, टायगर पॉईंटकडे वाहनांच्या रांगा..

लोणावळा : स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आणि पावसाळी वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी शनिवारी (१५ ऑगस्ट) लोणावळ्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली. शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांसह रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये दिवसभर पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. मुंबई, पुणे तसेच परिसरातून अनेक पर्यटक कुटुंबासह लोणावळ्यात दाखल झाले होते.

पावसाळी पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या भुशी धरणावर आज पर्यटकांची तुफान गर्दी झाली. धरणाच्या पायऱ्यांवर बसून पावसाचे पाणी अंगावर घेत पर्यटकांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. गर्दी इतकी मोठी होती की, भुशी धरणाच्या पायऱ्यांवर पर्यटकांची अक्षरशः गर्दीच गर्दी दिसत होती. अनेक ठिकाणी पर्यटकांनी पायऱ्यांचा मोठा भाग व्यापल्याने पायऱ्याही दिसेनाशा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कुटुंबासह आलेल्या पर्यटकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. पावसाच्या सरी, धुक्याने वेढलेले डोंगर आणि हिरवाईने नटलेला परिसर यामुळे पर्यटकांनी मोबाईलमध्ये आठवणी टिपत स्वातंत्र्यदिनाची सुट्टी अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला.

लोणावळ्याच्या टायगर पॉईंटकडेही पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला होता. टायगर पॉईंटवरून दिसणारे धुक्यात हरवलेले डोंगर, दऱ्या आणि पावसाळी निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. पर्यटकांची संख्या वाढल्याने टायगर पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही पर्यटकांना पर्यटनस्थळापर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ वाहतूक कोंडीत थांबावे लागले.

भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट यांसह लोणावळा परिसरातील विविध पर्यटनस्थळांवर दिवसभर गर्दीचे चित्र होते. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत मार्ग, खाद्यपदार्थांचे स्टॉल, हॉटेल्स आणि बाजारपेठांमध्येही पर्यटकांची वर्दळ वाढली होती. पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक व्यावसायिकांच्या परिसरातही गर्दी दिसून आली.

स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आणि वाढलेली पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन लोणावळा पोलिसांकडून प्रमुख पर्यटनस्थळे आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये तसेच पर्यटकांची सुरक्षितता कायम राहावी यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली.

पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाची सुट्टी, पावसाची साथ आणि हिरवाईने नटलेला लोणावळ्याचा निसर्ग यामुळे शनिवारी पर्यटननगरी अक्षरशः पर्यटकांनी फुलून गेली. भुशी धरणाच्या पायऱ्यांपासून टायगर पॉईंटच्या रस्त्यापर्यंत सर्वत्र गर्दीचेच चित्र दिसत होते.

Views: 98

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick