ध्वजारोहणानंतर मुलांच्या भाषणांनी आणि नृत्याने वेधले उपस्थितांचे लक्ष; शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप..
खंडाळा : जोशाबा मजूर संघटनेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या आदिवासी मुलांच्या अंगणवाडीत देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ उद्योजक मा. रमा शंकर गुप्ता आणि एल.एल.बी.च्या विद्यार्थिनी कु. निधी कैलास मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे तसेच नृत्य सादर केले. चिमुकल्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थित मान्यवर प्रभावित झाले.
यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी, लोणावळा शहर यांच्या वतीने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाला संघटनेचे उपाध्यक्ष नामदेव राठोड, विनोद साबळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुक्यातील नेते कैलास मोरे, लोणावळा शहर अध्यक्ष लोकेश भडकवाड, कार्याध्यक्ष संजयभाऊ कांबळे, प्रवीण (दयाभाऊ) रोकडे, रोहन गायकवाड, रोहन कांबळे, बशीर भाई शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. उपस्थितांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन जोशाबा मजूर संघटनेचे अध्यक्ष मा. अंकुश भाऊ चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सौ. साधना नाईक आणि रेश्मा सूर्यवंशी यांनी केले.

















