१५ ऑगस्टला लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे विशेष नियोजन..

लोणावळा : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी लोणावळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे. पर्यटकांची वाढती गर्दी आणि वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन लोणावळा शहर पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन केले आहे. पर्यटकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

१५ ऑगस्टला मोठ्या बसेस तसेच मोठ्या वाहनांना लोणावळा शहरात प्रवेश दिला जाणार नसून, अशा वाहनांसाठी लोणावळा सेंटर पॉईंट वलवण परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांनी शहरात प्रवेश न करता निर्धारित पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, छोट्या वाहनांना लोणावळा शहरात प्रवेश देण्यात येणार असून, छोट्या वाहनांसाठी लोणावळा नगरपालिकेच्या माध्यमातून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांनी वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी वाहने पार्क न करता प्रशासनाने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासोबतच १५ ऑगस्टच्या दिवशी भुशी डॅम परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सकाळी भुशी डॅमला गेलेले पर्यटक दुपारनंतर परतीच्या मार्गाला लागतात आणि त्याच वेळी नवीन पर्यटक भुशी डॅमच्या दिशेने जाण्यास सुरुवात करतात. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वेळेचे नियोजन केले आहे.

पर्यटकांनी भुशी डॅमला जाण्याचे नियोजन सकाळच्या वेळेतच करावे. दुपारी ४ वाजल्यानंतर भुशी डॅमकडे जाणारा मार्ग बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ४ वाजल्यानंतर भुशी डॅमच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पर्यटकांनी विशेष काळजी घ्यावी. धोकादायक ठिकाणी जाणे, पाण्याच्या प्रवाहात उतरणे तसेच पोलिसांनी प्रतिबंधित केलेल्या भागात प्रवेश करणे टाळावे, असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

१५ ऑगस्टच्या सुट्टीत लोणावळ्यात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. पर्यटकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस तसेच नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे आणि सुरक्षित पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

Views: 46

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick