लोणावळा पूर ओसरला, महिना उलटला; नुकसानग्रस्तांच्या खात्यात अद्याप मदतीची प्रतीक्षा..

लोणावळा : ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने लोणावळा शहर आणि मावळ परिसराला अक्षरशः झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आणि शहरातील अनेक भागांना पुराचा फटका बसला. हुडको कॉलनी, इंद्रायणी नगर, कैलासनगर, पांगारे चाळ, द्वारकामाई, खंडाळा, भांगरवाडी, वर्धमान सोसायटी, नांगरगाव यांसह विविध भागांतील घरांमध्ये आणि बंगल्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. ५ व ६ जुलैच्या अतिवृष्टीमुळे लोणावळ्यात पूरस्थिती निर्माण झाली होती आणि शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले होते.

या पुरात सर्वाधिक फटका सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना बसला. घरातील संसारोपयोगी साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर तसेच वाहनांचे मोठे नुकसान झाले. काही नागरिकांच्या महागड्या मोटारी पुराच्या पाण्यात अडकून निकामी झाल्याने त्या अक्षरशः भंगाराच्या किमतीत देण्याची वेळ आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक कुटुंबांसाठी हे नुकसान लाखो रुपयांचे असल्याने महिनाभरानंतरही त्यांचा आर्थिक ताण कायम आहे.

पूरस्थिती इतकी गंभीर होती की, काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर घरातील सामानासोबत सापही पाण्यातून घरात आल्याचे नागरिकांनी सांगितले. पुराच्या पाण्यात साप तरंगताना दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या पुरामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पूर ओसरल्यानंतर नुकसानग्रस्त नागरिकांनी नगरपरिषदेकडे धाव घेतली. नागरिकांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी गटारे तसेच इंद्रायणी नदीपात्राची वेळेवर आणि योग्य पद्धतीने साफसफाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे मुसळधार पावसाच्या काळात पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही आणि यंदा पुराच्या पाण्याची पातळी व त्याचा फटका मागील वर्षांच्या तुलनेत अधिक गंभीर झाल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.

लोणावळ्यात यापूर्वीही दोन वेळा पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्या वेळी पाणी आले असले तरी यंदाच्या ६ जुलैच्या पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली नव्हती, असा दावा नागरिकांनी केला. यंदा इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आणि नागरिकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी गटारे, नाले आणि इंद्रायणी नदीपात्राची पावसाळ्यापूर्वीच योग्य प्रकारे साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी मोर्चादरम्यान नागरिकांनी केली होती.

नागरिकांच्या मागणीनंतर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित घरांमध्ये जाऊन नुकसानीची माहिती घेतली आणि नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रे जमा केली. अनेकांकडून बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रतीही घेण्यात आल्या. त्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम थेट संबंधितांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा नागरिकांना निर्माण झाली.

मात्र, आता या घटनेला जवळपास एक महिना उलटत आला तरी अनेक नुकसानग्रस्तांच्या खात्यात अद्याप एक रुपयाचीही मदत जमा झालेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. सुरुवातीला नुकसानभरपाई मिळणार असल्याचे सांगण्यात आले; मात्र आता नेमकी मदत कधी मिळणार, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

दरम्यान, पूरग्रस्त नागरिकांनी नगरपरिषदेकडे मोर्चा काढून नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्यानंतर पंचनामे आणि अर्जाची प्रक्रिया करण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष आर्थिक मदतीची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. त्यामुळे ‘पंचनामे झाले, कागदपत्रे घेतली, मग मदत कधी?’ असा सवाल नुकसानग्रस्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोणावळ्यातील पूरस्थितीवरून नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतही जोरदार चर्चा झाली होती. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पूरस्थितीला जबाबदार घटक निश्चित करून नागरिकांचे नुकसान भरून काढण्याची मागणी केली होती. काही नगरसेवकांनी टाटा कंपनीकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची मागणी केली होती, तर काहींनी प्रशासन आणि नालेसफाईच्या प्रश्नावरही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली होती.

मात्र, या सर्व चर्चांनंतरही प्रत्यक्ष नुकसानग्रस्तांच्या हातात मदत पोहोचलेली नसल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. ‘आज पैसे येतील, उद्या पैसे येतील’ या अपेक्षेवर अनेक कुटुंबे अजूनही बसून आहेत. प्रशासनाकडून टाटा कंपनीशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असल्याची नागरिकांची माहिती आहे. मात्र, टाटा कंपनीकडून मदत मिळाल्यानंतरच नुकसानभरपाई देण्यात येणार असेल, तर त्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असताना मदतीसाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासनाने या प्रकरणात तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, नुकसानग्रस्तांची अंतिम यादी जाहीर करावी आणि पात्र नागरिकांना आर्थिक मदत कधी मिळणार याची निश्चित तारीख सांगावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, ६ जुलैच्या अतिवृष्टीने लोणावळा-कर्जत घाट परिसरातही मोठा फटका बसला होता. या काळात अत्यंत मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आणि जनजीवन विस्कळीत झाले होते.

Views: 65

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick