मुंबईतून अल्पवयीन मुलीला फूस लावून लोणावळ्यात आणले; व्हिल्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप, तिघांविरुद्ध गुन्हा..

मुंबईतून अल्पवयीन मुलीला फूस लावून लोणावळ्यात आणले; व्हिल्यावर अत्याचाराचा आरोप! व्हॉट्सॲपवर आत्महत्येचा बनाव, तिघांवर पोक्सोचा गुन्हा..

लोणावळा : मुंबईतील जोगेश्वरी येथून १४ वर्षे ११ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांपासून दूर करून फूस लावत लोणावळ्यात आणल्यानंतर एका व्हिल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी करण राजू सपकाळ (वय २५), योगेश राजू भार्गव (वय २३) आणि तन्मय भरत कुडवे (वय १९, तिघेही रा. जुना खंडाळा, लोणावळा) यांच्याविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी रेल्वे स्टेशन परिसरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. त्यानंतर करण राजू सपकाळ याने तिला लोणावळ्यातील एका व्हिल्यावर नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणात मुलीच्या मित्राच्या व्हॉट्सॲपवर जबरदस्तीने व्हिडिओ कॉल करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगण्यास मुलीला भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून आत्महत्या करत असल्याची खोटी माहिती देण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. मुलीला तिच्या पालकांपासून दूर नेऊन स्वतःच्या ताब्यात ठेवल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६५(१), ७४, १३७(२), ३(५), ३५१(२), ३५१(३) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) २०१२ मधील कलम ४, ८, १२ आणि १७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

६ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.१५ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक लोकरे करीत आहेत.

Views: 1,442

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick