कर्णकर्कश आवाज करणारे बुलेट सायलेंसर, काळ्या फिल्मच्या गाड्या आणि वाहनांवर बेकायदा ‘आमदार’ स्टिकर लावणाऱ्यांवर कारवाई..
लोणावळा : महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखेने कारवाई मोहीम तीव्र केली आहे. बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी वरसोली टोलनाका येथे राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका दिवसात २८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेत कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाइड बुलेट सायलेंसर, चारचाकी वाहनांच्या काचांवर लावलेल्या नियमबाह्य काळ्या फिल्म, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणारे तसेच सीट बेल्ट न लावता वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय वाहनांच्या काचेवर ‘आमदार’ असे स्टिकर लावून त्याचा अनधिकृत वापर करणाऱ्या वाहनचालकांवरही पोलिसांनी कारवाई केली. काळ्या फिल्म लावलेल्या वाहनांच्या काचा तत्काळ फिल्ममुक्त करण्यात आल्या.
वाहनांवर पदनामाचे किंवा अन्य विशेष ओळख दर्शविणारे स्टिकर लावून वाहतूक नियमांचे उल्लंघन करता येणार नाही. वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना कोणालाही विशेष सवलत दिली जाणार नाही, हे या कारवाईतून पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा उपविभाग गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक तथा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भूषण माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत महिला पोलीस उपनिरीक्षक विजया म्हेत्रे, पोलीस हवालदार विनोद गवळी, भूषण कदम, पवन कराड, मनोज मोरे, विनोद इकारी, श्रीपत वाजे, नितीन सुपे, यश जांभुळकर, भीमा वाळुंज आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, दुचाकी चालविताना हेल्मेटचा आणि चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करावा. वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेंसर वापरणे टाळावे, असे आवाहन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेने केले आहे. ‘आपला सुरक्षित प्रवास हाच आमचा ध्यास’ या भूमिकेतून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

















