टायगर पॉईंटच्या ४०० फूट खोल दरीत अनिकेत साबळेचा मृतदेह; शिवदुर्ग रेस्क्यू टीमची अडीच तासांची थरारक मोहीम..

रामनगरच्या २० वर्षीय अनिकेत साबळेचा दुर्दैवी मृत्यू; ४०० फूट खोल दरीतून शिवदुर्ग रेस्क्यू टीमने अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह काढला.

लोणावळा : लोणाव्यातील प्रसिद्ध टायगर पॉईंट येथे सुमारे ४०० फूट खोल दरीत पडलेल्या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. अनिकेत भीमा साबळे (वय २०, रा. रामनगर, भुशी, लोणावळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. खोल दरीत अडकलेला त्याचा मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू टीमने सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढला.

शिवदुर्ग रेस्क्यू टीमला १ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री टायगर पॉईंट परिसरातून एका व्यक्तीचा शोध घेण्याबाबत फोन आला होता. टायगर पॉईंट येथील दरीत उतरण्याच्या मार्गाजवळ एक तरुण दिसला होता. तो झाडाजवळ असल्याचे काही वेळापूर्वी निदर्शनास आले होते. मात्र, त्यानंतर तो दिसेनासा झाल्याने दरीत पडला असावा, अशी माहिती फोनद्वारे देण्यात आली होती.

त्यावेळी टीमचे सदस्य विसापूर येथे वाट चुकलेल्या एका मुलाच्या शोधकार्यासाठी जाण्याच्या तयारीत होते. तसेच लोहगड येथे एका पर्यटक डॉक्टरांची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग माकडाने पळवून नेल्याने त्या बॅगेच्या शोधकार्यातही काही सदस्य व्यस्त होते. अशा परिस्थितीत टायगर पॉईंट येथून मदतीचा फोन आला. मात्र, रात्रीची वेळ, पावसाचे वातावरण आणि टायगर पॉईंटच्या खोल दरीत बचावकार्य करण्यासाठी लागणारा वेळ व त्यातील धोके लक्षात घेता रात्रीच्या वेळी मोहीम राबविणे टीमच्या सदस्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नव्हते. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घटनास्थळी जाण्याचे निश्चित करण्यात आले. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांकडूनही टीमला निरोप मिळाला होता.

त्यानुसार आवश्यक हेडलॅम्प, वॉकीटॉकी, मोठ्या रोप कॉईल्स, हार्नेस आणि इतर बचाव साहित्य घेऊन शिवदुर्ग रेस्क्यू टीम टायगर पॉईंट येथे दाखल झाली. घटनास्थळाची पाहणी करून प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेण्यात आली. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे दरीतील खडक आणि परिसर निसरडा झाला होता. त्यामुळे सुरक्षेची विशेष काळजी घेत हार्नेसचा वापर करूनच बचावकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आवश्यक सेटअप तयार केल्यानंतर योगेश उंबरे आणि हर्ष तोंडे यांनी दरीत उतरण्यास सुरुवात केली. सुमारे १००, २०० आणि ३०० फूट खोल उतरत अखेर ४०० फूट खोल दरीत त्यांना तरुणाचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे छायाचित्र वर असलेल्या टीम सदस्यांना पाठविण्यात आले. त्यानंतर मृत तरुणाची ओळख अनिकेत भीमा साबळे अशी निश्चित झाली.

दरीत उतरलेल्या दोन्ही सदस्यांनी मृतदेह सुरक्षितपणे पॅक करून स्ट्रेचरला बांधला. त्यानंतर दोरखंडाच्या साहाय्याने मृतदेह वर खेचण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात आली. अत्यंत कठीण परिस्थितीत स्ट्रेचरच्या मदतीने मृतदेह वर आणण्याचे काम सुरू झाले. अखेर सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

या बचावकार्यात सागर दळवी, सागर कुंभार, योगेश उंबरे, हर्ष तोंडे, प्रिन्स बैठा, महेश मसने, गणेश भांगरे, भावेश दानवे, आनंद गावडे, शैलेश उंबरे, साहेबराव चव्हाण, महादेव भवर, पिंटू मानकर, संतोष मरगळे (पोलीस पाटील), सुनील गायकवाड आदी सहभागी झाले होते. या मोहिमेत स्थानिक नागरिकांनीही मोठे सहकार्य केले. तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

Views: 884

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick