लोणावळ्यात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; पाच दुकानांतून १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लंपास..

गोपीनाथ मुंडे कॉम्प्लेक्समधील पाच दुकानांना चोरट्यांचे लक्ष्य; शटर उचकटून रोख रकमेसह शूज, घड्याळे व कपडे लंपास. कपड्यांच्या दुकानातील चोरी सीसीटीव्हीत कैद; तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल.

लोणावळा : लोणावळा शहरातील इंद्रायणी नगर परिसरातील गोपीनाथ मुंडे कॉम्प्लेक्समध्ये चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पाच दुकानांना लक्ष्य करत रोख रक्कम आणि विविध वस्तू असा एकूण १ लाख ३० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कपड्यांच्या दुकानात चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली असून, या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लोणावळा ते भांगरवाडी रस्त्यावरील गोपीनाथ मुंडे कॉम्प्लेक्समध्ये ही चोरी झाली. चोरट्यांनी दुकानांचे शटर अर्धवट उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर सत्यम फॅशन शूज, क्रेझ बुटीक, चैतन्य चाट, पार्टी बलून हब आणि मी अँड मॉम या दुकानांमध्ये चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेत सत्यम फॅशन शूज दुकानातून ६० हजार रुपयांची रोख रक्कम आणि साडेसात हजार रुपये किमतीचे १५ जोड शूज चोरीला गेले. क्रेझ बुटीकमधून २० हजार रुपये किमतीची १०० घड्याळे तसेच शर्ट, टी-शर्ट, पँट आणि जॅकेट असा एकूण १८ हजार ४०० रुपयांचा कपड्यांचा साठा चोरट्यांनी लंपास केला. याशिवाय पार्टी बलून हब दुकानातील २५ हजार रुपयांची रोख रक्कमही चोरीला गेली. या सर्व चोरीचा एकूण आकडा १ लाख ३० हजार ९०० रुपये आहे.

कपड्यांच्या दुकानातील चोरीदरम्यान चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. या फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या चोरीत तीन अनोळखी व्यक्ती सहभागी असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी शुभम सुनील शिंदे (वय ३०, रा. दामोदर कॉलनी, भांगरवाडी, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कदम या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

Views: 520

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick