अतिवेगाने लेन कटिंग केल्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुर्घटना; बोरज येथील २५ वर्षीय विशाल दाभाडेचा मृत्यू.
लोणावळा : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वलवण येथे भरधाव कारने दुचाकीला समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विशाल पांडुरंग दाभाडे (वय २५, रा. बोरज, ता. मावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी (२५ ऑक्टोबर) पहाटे एकच्या सुमारास राधे टाइल्स दुकानासमोर हा अपघात झाला.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल देवराम अडशिरे (वय ३९, रा. पाचणे, माऊलीनगर, ता. मावळ) हा टोयोटा ग्लान्झा कार (एमएच १४ केओ ९३१४) घेऊन मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जात होता. यावेळी त्याने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत लेन बदलून दुचाकीला समोरून धडक दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या धडकेत दुचाकीस्वार विशाल दाभाडे गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला, तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
या प्रकरणी राहुल खंडू दाभाडे (वय ३२, व्यवसाय शेती, रा. बोरज, ता. मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, ३२४(४), ३२४(५) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चाकणे करीत आहेत.
अष्ट दिशा 24/7 न्यूज

















