लोणावळा पोलिसांची मोठी कारवाई: वलवण परिसरातून पावणेतीन लाखांचे ‘एमडी’ जप्त, मुंबईतील तस्कर अटक!

वलवण गावच्या हद्दीत जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत पोलिसांनी केली धडक कारवाई.आरोपी शाहरुख शेख याच्याकडून तब्बल २४ ग्रॅम १९ मिलीग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज हस्तगत.

लोणावळा : लोणावळा शहर पोलिसांच्या हद्दीत वलवण येथे एमडी (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी शाहरुख अतिक शेख (वय ३५, रा. गोवंडी, मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून २४ ग्रॅम १९ मिलीग्रॅम वजनाचा आणि २ लाख ९१ हजार ९०० रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) रात्री सुमारे ११ वाजून ३२ मिनिटांनी वलवण गावच्या हद्दीत जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत क्लासिक मार्बल दुकानाशेजारील मगनलाल चिक्की दुकानासमोर ही कारवाई करण्यात आली. लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना शाहरुख शेख याच्याकडे एमडी अंमली पदार्थ आढळून आला. त्याच्याकडून विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या जवळ बाळगलेले २ लाख ९१ हजार ९०० रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार गणेश तिलकराज होळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५१/२०२६ अन्वये अमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांबाबतच्या (NDPS) कायद्यातील कलम ८(क) व २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकरे करीत आहेत.

Views: 350

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick