मावळ तालुक्यातील मऊ गावात बिबट्या मृतावस्थेत; पोटाजवळ फासासारखी वस्तू आढळल्याने वनविभागाचा तपास..

मऊ : मावळ तालुक्यातील मऊ गावात शेतजमिनीवरील लोखंडी जाळीच्या कुंपणात अडकलेल्या अवस्थेत सुमारे पाच वर्षांचा नर बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) सकाळी ही घटना उघडकीस आली. बिबट्याच्या पोटाजवळ तारांच्या फासासारखी वस्तू आढळल्याने त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी वनविभागाने तपास सुरू केला आहे.

मऊ गावातील श्रीकांत चव्हाण यांच्या मालकीच्या शेतातील लोखंडी जाळीच्या कुंपणात बिबट्या अडकल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी गुरुवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या जिवंत असण्याची शक्यता लक्षात घेऊन वडगाव मावळ येथील वन्यजीव जलद बचाव पथक आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, घटनास्थळी तपासणी केली असता बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

प्राथमिक तपासणीदरम्यान बिबट्याच्या पोटाजवळ तारांच्या फासासारखी वस्तू आढळून आली. त्यामुळे बिबट्या कुंपणात अडकून मृत झाला की अन्य काही कारणामुळे त्याचा मृत्यू झाला, याबाबत वनविभागाकडून चौकशी केली जात आहे. या वस्तूमुळेच बिबट्याचा मृत्यू झाला, असे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) निर्धारित केलेल्या कार्यपद्धतीनुसार बिबट्याचे शवविच्छेदन पुण्यातील बावधन येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये करण्यात आले. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, वनविभागाने पुढील तपास सुरू केला आहे.

पुणे वनवृत्ताचे वनसंरक्षक आशिष ठाकरे आणि पुण्याचे उपवनसंरक्षक अभिजित वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मावळचे सहाय्यक वनसंरक्षक मंगेश ताटे यांनी या प्रकरणाची माहिती दिली असून, शिरोटा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ टाकवळे तपास करीत आहेत.

शेतातील कुंपणात बिबट्या मृतावस्थेत आढळणे आणि त्याच्या पोटाजवळ फासासारखी वस्तू सापडणे या बाबींचा तपास वनविभागाकडून केला जात आहे. बिबट्याच्या मृत्यूमागील नेमके कारण काय आणि या घटनेत काही बेकायदेशीर प्रकार घडला आहे का, हे तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

Views: 144

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick