लोणावळ्यात भीषण अपघात; १६ वर्षीय रुपेश वाघमारेचा टँकरखाली येऊन मृत्यू..

सीसीटीव्ही फुटेज समोर; आदिवासी महिला आणि युवकांचे रस्ता रोको आंदोलन, रिसॉर्ट प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन..

लोणावळा : लोणावळा शहर परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात रुपेश वाघमारे या १६ वर्षीय आदिवासी मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संतप्त आदिवासी महिला आणि युवकांनी घटनास्थळी ठिय्या देत रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात अपघाताचा घटनाक्रम दिसत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या घटनाक्रमानुसार, रुपेश वाघमारे हा आपल्या होंडा डिओ दुचाकीवरून जात असताना त्याच्या पुढे चाललेल्या वाहनाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून रुपेशची दुचाकी त्या वाहनाच्या मागील बाजूस धडकली. या धडकेनंतर रुपेश रस्त्याच्या उजव्या बाजूला पडला. त्याच वेळी समोरून येत असलेल्या डेला रिसॉर्टच्या पाण्याच्या टँकरच्या मागील चाकाखाली तो आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळेच अपघात झाल्याचा आरोप करत संतप्त आदिवासी महिला आणि युवकांनी संबंधित मार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले. डेला रिसॉर्ट प्रशासनाने या अपघाताची जबाबदारी स्वीकारून मृत रुपेशच्या कुटुंबीयांना मदत करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संतप्त आंदोलकांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. डेला रिसॉर्ट प्रशासनाने मृत मुलाच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन तात्पुरते मागे घेतले.

अल्पवयीन रुपेशच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताप्रकरणी लोणावळा शहर पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. अपघाताची नेमकी कारणे आणि संबंधितांची जबाबदारी याबाबत पोलिसांच्या तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे.

Views: 378

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick