१२ वर्षांची भागीदारी; शिक्षण, रोजगार आणि उपजीविकेच्या माध्यमातून २७ हजारांहून अधिक नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल..
लोणावळा, प्रतिनिधी : सामाजिक विकास आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल eClerx Services Limited या कंपनीला प्रतिष्ठित ‘महात्मा पुरस्कार – CSR Excellence 2026’ प्रदान करण्यात आला आहे. संपर्क (SAMPARC) संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण आणि आदिवासी भागांतील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना सहकार्य केल्याबद्दल कंपनीचा हा गौरव करण्यात आला.
संपर्क संस्था आणि eClerx यांच्यात गेल्या १२ वर्षांहून अधिक काळ सामाजिक विकासासाठी भागीदारी सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागांतील मुले, युवक आणि गरजू कुटुंबांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही संस्थांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या संयुक्त उपक्रमांमधून आतापर्यंत २७ हजारांहून अधिक नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यात आला आहे.
शिक्षण, रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन या क्षेत्रांत या भागीदारीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. वंचित मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, पालकांचे छत्र हरवलेल्या मुलांना आधार देणे, ग्रामीण युवकांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये शिकविणे आणि आदिवासी कुटुंबांसाठी उपजीविकेच्या संधी बळकट करणे, अशा उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. गरजू नागरिकांना मदत करण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनवून सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या कार्याचा मुख्य उद्देश आहे.
या भागीदारीत eClerx कंपनीचे नेतृत्व, CSR बोर्ड, CSR टीम आणि कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. तसेच कै. एस. रमेशजी कचोलिया, संस्थापक, केअरिंग फ्रेंड्स, मुंबई आणि पी. डी. मुंध्रा, सह-संस्थापक व कार्यकारी संचालक, eClerx Services Limited यांनी या उपक्रमांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संपर्क संस्थेच्या सामाजिक कार्याला बळ मिळाले.
संपर्क संस्थेचे संस्थापक सचिव अमितकुमार बॅनर्जी यांनी या भागीदारीला सामाजिक संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्राने एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे सांगितले. तसेच या उपक्रमांसाठी सातत्याने कार्य करणारे संपर्क संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज सिंग आणि संपूर्ण टीमचे त्यांनी आभार मानले.
‘महात्मा पुरस्कार – CSR Excellence 2026’ हा सन्मान eClerx कंपनीच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याची पोचपावती मानला जात आहे. आगामी काळातही शिक्षण, रोजगार, आर्थिक स्वावलंबन आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी संपर्क संस्था व eClerx यांची भागीदारी कायम ठेवण्याचा संकल्प आहे.

















