खंडाळा पोलीस प्रशिक्षण शाळेजवळ दुचाकीचा भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर..

लोणावळा : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा आणि खंडाळ्यादरम्यान खंडाळा पोलीस प्रशिक्षण शाळेजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, लोणावळ्याच्या दिशेने मुंबईकडे जाणाऱ्या दुचाकीवर तिघे तरुण प्रवास करत होते. दुचाकी भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी समोरून येणाऱ्या रिक्षाला धडकली. रिक्षाला धडक दिल्यानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनावर जाऊन आदळली. या धडकेत तिघेही रस्त्यावर पडले.

अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस तसेच खंडाळा महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणांना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, दुचाकी चालविणाऱ्या तरुणाचा या अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, या अपघातानंतर जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या कडेला बेशिस्तपणे उभी केली जाणारी वाहने पुन्हा चर्चेत आली आहेत. खंडाळा पोलीस प्रशिक्षण शाळेच्या परिसरात रस्त्याच्या कडेला अनेक वाहने नियमितपणे उभी केली जात असल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वीही रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांना धडकून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

Views: 299

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick