” आमची अंगणवाडी – आमची जबाबदारी ” या उपक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन !

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प पनवेल, बीट वावंजे अंगणवाडी केंद्र वलप १-२ आणि अल्केम फाउंडेशन यांच्या माध्यमातून ९ वा ” राष्ट्रीय पोषण माह २०२६ ” उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त लाभार्थ्यांनी विविध पौष्टिक पदार्थ तयार करून आणले. लाभार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व व फायदे याबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमा दरम्यान ” आमची अंगणवाडी – आमची जबाबदारी ” या उपक्रमांतर्गत ऍनिमिया प्रतिबंध, आहारातील विविधता, पुरेसे प्रथिने सेवन, स्तनपान तसेच योग्य पूरक आहार (अन्नप्राशन) याबाबत जनजागृती करण्यात आली. संतुलित व पौष्टिक आहाराचे महत्त्व आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषणाची भूमिका यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य कमला देशेकर, ग्रामसेवक रेश्मा गावंड, ग्रामपंचायत सदस्य श्वेता पाटील, जयमाला पाटील व वर्षा पाटील, बचत गट अध्यक्षा खेडेकर तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका दीपा मयेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अश्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुटुंबांमध्ये पोषणाबाबत जागरूकता निर्माण करून निरोगी व सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी सकारात्मक संदेश देण्यात आला.

















