” बहुगुणी कलारत्न पी. ए. ऊर्फ जीवन घोडके यांचा संघर्षमय जीवनपट “.

” जन्मोत्सव कार्यक्रम ” १ ऑक्टोबर रोजी ” मोठे वेणगाव ” येथे संध्या. ७ वाजता होणार साजरा..

भिसेगाव- कर्जत / सुभाष सोनावणे –मनुष्य ध्येयाने पछाडला की त्याला आपला समाज आपल्या जीवनाचे , कुटुंबाचे अविभाज्य घटक दिसत असतो . सामाजिक बांधिलकी जपत आपण या समाजाचे ऋणी आहोत , समाजाप्रती काहीतरी केले पाहिजे , ही तळमळ सतत ” ज्योती ” प्रमाणे तेवत ठेवून आपले शरीर त्याग कार्य करून झिजवणारे या समाजात हाताच्या बोटावर आपण पहात असतो . त्यातीलच एक शिल्परत्न म्हणजे शिल्पकार साहित्य कला मंडळ – कर्जतचे संस्थापक , साहित्यिक , शीघ्र कवी , समाजरत्न पुरस्कृत , समाजसेवक , पी.ए.घोडके उर्फ जीवन घोडके यांच्या संघर्षमय जीवनाचा जीवनपट त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने उलगडावासा वाटतो.

” काव्य हे आईना आहे , आईना ही काव्य आहे , असे भासते मनाला पण मीच का म्हणावे ……कविता हे जीवन आहे जीवन हे काव्य आहे , असे भासते मनाला पण मीच का म्हणावे……. या कविता प्रमाणे सागराच्या देहातून निर्माण होणाऱ्या लहरी त्याप्रमाणे आमचा जन्म एक अशा वैचारिक सागरातून झाला आणि ते सागर म्हणजे सर्वांचे बाबा , आमचे श्रद्धास्थान आमचे गुरुवर्य पांडुरंग अर्जुन घोडके उर्फ जीवन घोडके यांचा जन्म ०१ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला , तर ते २४ एप्रिल २०२१ या दिवशी बुद्धवासी झाले .” पांडुरंग अर्जुन घोडके ते जीवन घोडके ” हा त्यांचा प्रवास पाहणारे खूप असतील पण त्यांची ती समाजाप्रती असलेली ” तळमळ ” पाहण्याचे सौभाग्य त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या मुलांना मिळाले , हे त्यांचे भाग्यच . त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथे झाला.त्यांच्या कुटुंबात आई – वडील , काका – काकू आणि बहीण असे मोठे कुटुंब परिवार त्या काळात होता.

गरिबी असल्याने शिक्षण घेण्यास अनंत अडचणी येत असे , मात्र त्यांना शिक्षणाची आवड असल्यामुळे वडिलांनी त्यांना घरातून शिकवण्यास सुरुवात केली . परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खूप संकट आली पण अशा परिस्थितीत इयत्ता चौथीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले , पुढे शिकायची ईच्छा होती पण त्यांचे वडील मयत झाले आणि त्यांचे शिक्षण तिथेच थांबले . परंतु न डगमगता त्याही परिस्थितीत आईची व बहिणीची जबाबदारी घेऊन लहान वयात कामे करणे , त्यातूनच वाचनाचा छंद जोपासत छत्रपती शिवाजी महाराज – डॉ.बाबासाहेब आंबेडकर – फुले – शाहू – तथागत भगवान बुद्ध – कबीर – संत गाडगे बाबा – स्वामी विवेकानंद यांची पुस्तके वाचून आणि बाबासाहेबांची गीते , भजन – कीर्तन – भक्ती गीते – लोकगीते ऐकून त्यातून वाद्य संगीत यांची आवड निर्माण झाली . मुळातच वाचनाची आवड , संगीताची आवड त्यांच्या साधारण वयाच्या १६ व्या वर्षी लागताच अनेक कार्यक्रम त्यांनी एक गायन संघ , मित्र परिवाराच्या बरोबरीने तयार केला.

हरिश्चंद्र सोनावणे , बळीराम सोनावणे , अशोक गवळे , तानाजी गायकवाड , जानू गायकवाड , रामचंद्र गवळे हे सगळे मिळून कोणाच्या शेतात , कुणाच्या घरात , तर कोणाच्या भातखळ्यात वाद्य घेऊन ताल धरून गायनाला शिकले . पण वाद्यासाठी कोणताही गुरु नसताना भजनाचा ताल धरून ते पेटी तसेच तबला ढोलकी हे वाजवायला शिकले . त्याही परिस्थितीत शीघ्र कवी म्हणून विठ्ठल उमप , प्रल्हादजी शिंदे , यांच्या बरोबर ते गायनाला बसत होते.

बँकेत नोकरीला असूनही समाजाप्रती त्यांचे प्रेम आणि बांधीलकी जपत भारतीय बौद्ध महासभा , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , कॉम . नाना ओव्हाळ यांच्या बरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षात काम करून गावोगावी जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार – प्रसार – प्रबोधन केले . कॉम. नाना ओव्हाळ सारख्या मोठ्या विद्वान माणसाचा सहवास त्यांना लाभला . कुठे मोर्चे तर कुठे उपोषणे करून त्यांनी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला . रस्ते , वीज , पाणी , एस टी सेवा , अन्याय , अत्याचार या विरोधात त्यांची उपोषणे बबन गायकवाड , गोपीनाथ ओव्हाळ , गोपाळ शेळके यांच्या सोबतीने चांगलीच गाजली . त्यांच्या सर्व कार्यात सावली सारखी बरोबर असणारी त्यांची पत्नी सुमन व मुले प्रेरणा – अभिनय – अश्विनी – प्रगती व प्रणित यांची साथ नेहमीच होती.

समाजात जाऊन कलाकारांना न्याय देण्यासाठी त्यांनी सन २०१० ला शिल्पकार साहित्य कला मंडळ स्थापन केले . त्यासाठी त्यांनी सन २०१० ला आपल्या बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला .त्यांचा शिल्पकार साहित्य कला मंडळ स्थापन करण्याचा उद्देश असा होता की , जे कलाकार ऐन तरुणपणी कलाकार म्हणून जगतात मात्र वृद्धापकाळात त्यांचे जीवन खूप खडतर होते , त्यांना पेन्शन योजना , किंवा इतर काही मानधन , आधार सुरू करणे , असा त्यांचा मानस होता आणि त्यात ते यशस्वीही झाले . ते एक शीघ्र कवी होते , गायक विजय ढोले , अशोक सोनावणे आणि दिवंगत चंद्रकांत पवार यांचे ते गुरुवर्य होते . अश्या या महान कलारत्नाचा जीवनपट ” संघर्षमय ” होता. ” पी.ए.घोडके तथा जीवन घोडके ” या संघर्षमय नायकाच्या – कलाकाराच्या जीवनपटाचा परिनिर्वाण २४ एप्रिल २०२१ म्हणजे त्यांनी स्थापन केलेल्या ” शिल्पकार साहित्य कला मंडळ ” या वर्धापन दिनीच झाला .

आज गुरुवार ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त या कलारत्नास व त्यांच्या अजरामर काव्यास भावपूर्ण आदरांजली ! आज १ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठे वेणगाव – बौद्ध नगर येथे संध्या. ७ वाजता ” जन्मोत्सव कार्यक्रम ” साजरा होणार असून सर्व कला , सांस्कृतिक व गायन प्रेमींनी तसेच वेणगाव ग्रामस्थांनी उपस्थित रहावे , असे निमंत्रण शिल्पकार साहित्य कला मंडळ , घोडके व प्रेरणा भालेराव परिवाराने केले आहे.

Views: 86

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick