लोणावळ्यात ग्रामीण पोलिसांवर हप्ता वसुलीचा आरोप; हॉटेल दौलतच्या मालकाच्या मुलासह ९ जणांना मारहाण केल्याचाही आरोप..

लोणावळा : वाकसई येथील हॉटेल दौलत इनवर झालेल्या पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांवर हप्ता वसुली, मारहाण आणि सीसीटीव्हीचे डीव्हीआर ताब्यात घेतल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हॉटेलचे मालक जगन्नाथ पंढरीनाथ शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले. यासंदर्भात त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे तक्रारही केली आहे.

शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, हॉटेल दौलत इन मध्ये अवैध दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी पोलिस अधिकारी गौरव तळपे यांच्याकडून दरमहा सात हजार रुपयांचा हप्ता ठरविण्यात आला होता. दर महिन्याला नियमितपणे ही रक्कम दिली जात असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र, २१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेलवर अचानक पोलिस कारवाई करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

या कारवाईदरम्यान पोलिस अधिकारी अजय देवकाते यांनी कंबरेला रिव्हॉल्व्हर लावून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. त्यांच्या मुलगा शुभम शिंदे, नऊ कामगार तसेच मावसभाऊ ओम सुनील शिंदे यांना मारहाण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पोलिसांनी कर्मचाऱ्यांकडे गांजा, चरस, अफू किंवा अन्य अमली पदार्थ आहेत का, अशी विचारणा केल्याचेही शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, कारवाईदरम्यान अमली पदार्थ सापडले नसून दारूसंदर्भात कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

मारहाण आणि शिवीगाळीचे सीसीटीव्ही फुटेज हॉटेलमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितल्यानंतर, २२ सप्टेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास पोलिसांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून सीसीटीव्हीच्या डीव्हीआर संचाची हार्डडिस्क ताब्यात घेतल्याचा आरोप शिंदे यांनी केला. संबंधित घटनेचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच आपल्याविरोधात तक्रार दाखल करून तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

‘गेल्या नऊ वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू होती आणि दरमहा सात हजार रुपये हप्ता दिला जात होता. मग अचानक हप्ता देऊनही रात्री कारवाई का करण्यात आली आणि कामगारांना मारहाण का करण्यात आली?’ असा सवाल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यास आपली हरकत नसल्याचे सांगताना, मारहाण करणे तसेच रात्री हॉटेलमध्ये प्रवेश करून सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.

या संपूर्ण प्रकरणाबाबत हॉटेल मालक जगन्नाथ शिंदे यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारीबाबत पोलिस अधीक्षक संदीप गिल यांच्याशी संपर्क साधला असता, “आलेल्या तक्रारी तपासून योग्य ती कारवाई केली जाईल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, हॉटेल मालकाने केलेल्या हप्ता वसुली, मारहाण, धमकी आणि सीसीटीव्ही हार्डडिस्क ताब्यात घेण्याच्या आरोपांबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची स्वतंत्र बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे तक्रारीतील आरोपांची पोलिस चौकशीतून सत्यता स्पष्ट होणार आहे.

Views: 299

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick