शिरगावातील आस्थापनांचे सांडपाणी आणि लिचेट नाल्याद्वारे पवना नदीत; एमपीसीबीच्या प्रतिज्ञापत्रातून गंभीर बाब समोर..
मावळ : शिरगाव (ता. मावळ) परिसरातील चार आस्थापनांचे सांडपाणी आणि लिचेट नाल्याद्वारे पवना नदीपर्यंत पोहोचत असल्याची गंभीर बाब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) पाहणीत समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित चार आस्थापनांवर एकूण २ कोटी ५८ लाख १७ हजार ५०० रुपयांची पर्यावरणीय नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादासमोर (एनजीटी) एमपीसीबीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली.
एमपीसीबीने निश्चित केलेल्या नुकसानभरपाईमध्ये गंगा पेपर्स इंडिया लिमिटेडवर १ कोटी ७१ लाख रुपये, रायझिंग प्रॉपकॉन एलएलपीवर ६२ लाख ६२ हजार रुपये, मॅनेग्रो अँग्रो प्रॉडक्ट्सवर २० लाख ७५ हजार रुपये आणि काराग्या फूड्सवर ३ लाख ८० हजार रुपये अशी रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
एमपीसीबीच्या पाहणीत मॅनेग्रो अँग्रो प्रॉडक्ट्स येथील ईटीपी आणि एसटीपी बंद असल्याचे आढळले. भुसा आणि बॉक्स धुण्याच्या प्रक्रियेतून निर्माण होणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी आवाराबाहेर सोडले जात असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. या सांडपाण्यातून निर्माण होणारे लिचेट जवळच्या नाल्यातून पवना नदीत पोहोचत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
गंगा पेपर्स इंडिया लिमिटेड येथे ईटीपी स्लजमधून निर्माण होणारे लिचेट नाल्यात जात असल्याचे, तसेच कागदी कचरा आणि मैलायुक्त गाळ उघड्यावर साठविल्याचे आढळले. कंपनीतील कामगार आणि पॉवर प्लांटमधून निर्माण होणारे सांडपाणीही नाल्याद्वारे पवना नदीपर्यंत पोहोचत असल्याची नोंद एमपीसीबीच्या अहवालात आहे.
रायझिंग प्रॉपकॉन एलएलपीच्या परिसरातील मागील नाल्यातही सांडपाण्याचा विसर्ग आढळल्याचे नमूद करण्यात आले असून, नाल्यालगत कचरा आणि बांधकामाचा राडारोडा टाकण्यात आल्याचे निरीक्षण एमपीसीबीने नोंदविले आहे. संबंधित चार आस्थापनांवरील नुकसानभरपाईची रक्कम उल्लंघनाचा कालावधी आणि उद्योगांची श्रेणी विचारात घेऊन निश्चित करण्यात आली आहे.

















