चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; आरोपीला तासाभरात अटक..

कुसगाव येथील घटना; दारूच्या नशेत पतीने दगड व विटांनी डोक्यात वार केल्याचा आरोप.

लोणावळा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्यातून झालेल्या किरकोळ वादानंतर दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात दगड व विटांनी वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुसगाव येथे घडली. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तासाभरात आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास कुसगाव येथे एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

घटनेनंतर आरोपी कर्नाटकच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तीन तपास पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांनंतर अवघ्या एका तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक भूषण माने करीत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, घटनेशी संबंधित पुरावे व इतर बाबींचा तपास करण्यात येत आहे.

अष्ट दिशा 24/7 NEWS
सत्य बातमी, थेट तुमच्यापर्यंत.

Views: 232

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick