लोणावळा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील वाकसई ग्रामपंचायतीच्या वतीने इंद्रायणी नदीकाठी नव्याने गणेश विसर्जन घाटाची निर्मिती करण्यात आली आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन सुरक्षित आणि सुरळीतपणे करता यावे, तसेच विसर्जनावेळी नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने हा घाट तयार करण्यात आला आहे.
येत्या १९ सप्टेंबर रोजी घरगुती गणपती तसेच गौरींचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मनोज जगताप, बाळासाहेब भरत येवले तसेच शाम विकारी यांनी पुढाकार घेत स्वतः उभे राहून घाटाच्या कामासाठी प्रयत्न केले. यासाठी तीन आर.एम.सी. गाड्यांमधून काँक्रीट टाकून विसर्जन घाटाची निर्मिती करण्यात आली आहे.
दरवर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी नदीकाठावर नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे सुरक्षित जागा, पायाभूत सुविधा आणि विसर्जनासाठी योग्य व्यवस्था असणे गरजेचे असते. नव्याने तयार करण्यात आलेल्या या घाटामुळे वाकसई परिसरातील नागरिकांना गणेश विसर्जनाच्या वेळी मोठी सोय होणार असून, विसर्जन प्रक्रिया अधिक व्यवस्थितपणे पार पडण्यास मदत होणार आहे.
विशेष म्हणजे हा घाट केवळ गणेश विसर्जनापुरता मर्यादित न राहता भविष्यात ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरासाठीही उपयुक्त ठरणार आहे. सकाळी मॉर्निंग वॉक, नियमित व्यायाम तसेच नदीकाठच्या परिसरात नागरिकांना काही वेळ घालवण्यासाठी या जागेचा उपयोग होऊ शकणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने तयार झालेली ही सुविधा ग्रामस्थांसाठी कायमस्वरूपी उपयोगाची ठरणार असल्याचे मनोज जगताप, बाळासाहेब भ. येवले व शाम विकारी यांनी सांगितले.
विसर्जन घाटाच्या निर्मितीवेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

















