कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पत्नीवर हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून दुसऱ्या मजल्यावरून घेतली उडी..
देहूगाव : देहूगाव येथील ओमकार हाउसिंग सोसायटीमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २०) पहाटेच्या सुमारास घडली. त्यानंतर पतीने स्वतःच्या अंगावरही वार करून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे.
शुभांगी आकाश बारस्कर (वय २८) असे मृत महिलेचे नाव असून, आकाश रामदास बारस्कर असे जखमी पतीचे नाव आहे. दोघेही देहूगाव येथील ओमकार हाउसिंग सोसायटीमध्ये भाड्याने राहत होते. शुभांगी या गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत आढळून आल्या, तर आकाश हा इमारतीखाली रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळून आला.
गस्तीवरील पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी शुभांगी यांना मृत घोषित केले. आकाश याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आकाश आणि शुभांगी यांच्यात मागील सुमारे वर्षभरापासून कौटुंबिक वाद सुरू होता. याच वादातून आकाशने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा प्राथमिक संशय आहे. त्यानंतर त्याने स्वतःवरही वार करून दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, घटनेमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, या प्रकरणात कृषी जमीन खरेदीवरूनही पती-पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे हत्येमागील नेमके कारण, घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि इतर बाबींचा देहूरोड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

















