विनयच्या गोष्टी’ बालकथा संग्रहाचा २० सप्टेंबरला पुण्यात प्रकाशन सोहळा..

कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने भटू देवरे व शिवदत्त वाबळकर यांचा गौरव..

मुळशी : प्रतिनिधी  बालसाहित्य, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची संधी पुणेकर साहित्यरसिकांना मिळणार आहे. साहित्यिक सुदाम विश्वे लिखित ‘विनयच्या गोष्टी’ या बालकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. अनिकेत प्रकाशन आणि काव्यमित्र संस्थेच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या साहित्यिक सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय, आंबवणे, ता. मुळशीचे मुख्याध्यापक भटू गिरीधर देवरे तसेच एम.एन.डी. कला व वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथील सहाय्यक प्राध्यापक शिवदत्त वाबळकर यांना ‘कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

बालकथांच्या माध्यमातून साहित्याचा परिचय आणि विचारांची जडणघडण घडविणाऱ्या ‘विनयच्या गोष्टी’ या संग्रहाच्या प्रकाशनासोबतच कार्यक्रमात परिवर्तनवादी कवितांची विशेष मेजवानीही रसिकांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे साहित्य, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार यांचा सुरेख संगम या कार्यक्रमातून घडणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड राहणार आहेत. लेखिका व कवयित्री मुक्ता कोरपे, साहित्यिक व ‘आयर्विन टाइम्स’चे संपादक मच्छिंद्र ऐनापुरे तसेच ज्येष्ठ कवी डॉ. देविदास बामणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

काव्यमित्र संस्थेचे राजेंद्र सगर आणि ‘अपेक्षा’ मासिकाचे संपादक दत्तात्रय उभे यांच्या संयोजनातून या साहित्यिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या साहित्यिक उपक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Views: 27

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick