लोणावळा : भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज, शुक्रवार (18 सप्टेंबर) लोणावळा दौऱ्यावर येत असून, शहरातील प्रतिष्ठित कैवल्यधाम योग संस्थेच्या गोरधनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या प्लॅटिनम ज्युबिली सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उपराष्ट्रपतींच्या लोणावळा दौऱ्यामुळे शहरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या आजच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुंबई, लोणावळा आणि पुणे या तीन ठिकाणांचा समावेश आहे. मुंबईतील कार्यक्रमानंतर ते दुपारी २ वाजता लोणावळ्यात दाखल होणार असून, त्यानंतर कैवल्यधाम येथे आयोजित प्लॅटिनम ज्युबिली सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमानंतर ते पुण्याकडे रवाना होणार असून, पुण्यातील नेहरू स्टेडियम येथे आयोजित पुणे फेस्टिव्हलच्या ३८व्या आवृत्तीला ते उपस्थित राहणार आहेत.
उपराष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपराष्ट्रपती ज्या मार्गाने कैवल्यधामकडे येणार आहेत, त्या मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चौकाचौकात तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असून, येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवरही लक्ष ठेवले जात आहे.
उपराष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारपासूनच बंदोबस्तात वाढ केली असून, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. मार्गावरील प्रमुख चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची उपस्थिती दिसून येत आहे. दौऱ्यादरम्यान वाहतूक सुरळीत राहावी आणि सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी पोलिस यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
योग शिक्षण, संशोधन आणि योगाच्या शास्त्रीय अभ्यासासाठी देश-विदेशात ओळख असलेल्या कैवल्यधाम संस्थेसाठी हा सोहळा विशेष महत्त्वाचा आहे. गोरधनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या 75 वर्षांच्या वाटचालीचा हा महत्त्वाचा टप्पा असून, या कार्यक्रमाला देशाच्या उपराष्ट्रपतींची उपस्थिती लाभणार आहे.
दरम्यान, उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे लोणावळ्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, कार्यक्रमाच्या ठिकाणासह उपराष्ट्रपतींच्या संभाव्य मार्गावर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

















