वडगाव मावळात जमीन व्यवहाराच्या नावाखाली १ कोटींची फसवणूक; तिघांवर गुन्हा..

वडगाव मावळ : उच्च न्यायालयाकडून जमीन मिळणार असल्याचे सांगून ७ कोटी ७८ लाख २१ हजार ७०४ रुपयांचा बनावट डिमांड ड्राफ्ट दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर जमीन विक्रीचा करार करून मुंबईतील एका व्यावसायिकाकडून १ कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र, ठरल्याप्रमाणे जमीन न देता रक्कमही परत न केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी मुंबईतील व्यावसायिक अंकुर गिरीश चौक्सी (वय ५७) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अमोल दशरथ जाधव (वय ४६, रा. नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड), डॉ. भगवान कराळे (रा. नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड) आणि अभिषेक सुनील जयस्वाल (रा. माटुंगा, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, १ नोव्हेंबर २०२४ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वडगाव मावळ येथील एका कार्यालयात हा प्रकार घडला. मावळ तालुक्यातील सावळा येथील गट क्रमांक ८६ मधील ६७ हेक्टर ७३ आर क्षेत्रापैकी १४ हेक्टर जमीन उच्च न्यायालयाकडून मिळणार असल्याचे आरोपींनी सांगितले.

विश्वास संपादन करण्यासाठी बँक ऑफ बडोदा, नेरळ शाखा, अधिकृत लिक्विडेटर आणि उच्च न्यायालय यांच्या नावाने तयार केलेला ७ कोटी ७८ लाख २१ हजार ७०४ रुपयांचा डिमांड ड्राफ्ट दाखवण्यात आला. हा ड्राफ्ट बनावट असल्याचा आरोप आहे.

त्यानंतर फिर्यादी आणि आरोपींमध्ये जमीन विक्रीचा करार झाला. १८ सप्टेंबर २०२५ रोजी वडगाव मावळ येथे करारनामा करण्यात आला असून, त्यासाठी फिर्यादीकडून दोन वेळा मिळून १ कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे.

मात्र, रक्कम घेतल्यानंतर जमीन फिर्यादीच्या नावावर करण्यात आली नाही आणि १ कोटी रुपयेही परत करण्यात आले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

तक्रारीच्या आधारे वडगाव मावळ पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३३८, ३३६(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर तपास करीत आहेत. व्यवहारातील कागदपत्रे, डिमांड ड्राफ्टची सत्यता, पैशांची देवाणघेवाण आणि जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. आरोपांची सत्यता तपासादरम्यान स्पष्ट होणार आहे.

Views: 363

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick