मुळशीत तरुणाची लुटमारीसाठी हत्या; हात-पाय बांधून मृतदेह तळ्यात फेकला..

मुळशी : लुटमारीच्या उद्देशाने तरुणाची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह तळ्यात फेकल्याची धक्कादायक घटना मुळशी तालुक्यातील लवळे परिसरात समोर आली आहे. महेंद्रकुमार ओमप्रकाश बंजारे (वय २६, मूळ रा. छत्तीसगड) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बावधन पोलिसांनी गोपाल ऊर्फ राज साधन बिस्वास (वय २०, रा. गाझीपूर, दिल्ली) याला अटक केली असून, त्याच्या आणखी एका साथीदाराचा शोध सुरू आहे.

महेंद्रकुमार बंजारे हा मुळशी तालुक्यातील लवळे गावातील दुधाळे वस्ती येथे पत्नीसमवेत राहत होता आणि मजुरीचे काम करत होता. ३० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याची पत्नी सुनीता बंजारे यांनी बावधन पोलिसांकडे त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, २ सप्टेंबर रोजी लवळे येथील शेडगेवस्ती परिसरातील तळजाईदेवी मंदिराजवळ असलेल्या तळ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची पाहणी केली असता हात-पाय टी-शर्टच्या सहाय्याने बांधण्यात आल्याचे तसेच पायाला वजनदार दगड बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आला.

पोलिसांनी तपासाची दिशा बदलून तांत्रिक तपासासह आरोपींचा शोध सुरू केला. तपासात महेंद्रकुमार याची लुटमारीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. महेंद्रकुमारला लक्ष्य केल्यानंतर त्याची हत्या करून मृतदेह तळ्यात फेकण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे. मृतदेह पाण्यावर तरंगू नये आणि पुरावा नष्ट व्हावा, यासाठी त्याच्या पायाला दगड बांधण्यात आल्याचेही तपासात पुढे आले आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्लीतील गोपाल ऊर्फ राज साधन बिस्वास याचा सहभाग समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला गाझीपूर, दिल्ली येथून अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, या गुन्ह्यात आणखी एक आरोपी सहभागी असण्याची शक्यता असून त्याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, लुटीची रक्कम जप्त करणे, गुन्ह्यात वापरण्यात आलेली साधने शोधणे तसेच अन्य आरोपीचा सहभाग स्पष्ट करणे यासाठी पोलिसांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने गोपाल बिस्वास याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बावधन पोलीस करीत आहेत.

पोलिसांच्या तपासात या हत्येमागील नेमका घटनाक्रम, लुटीची रक्कम आणि दुसऱ्या आरोपीची भूमिका याबाबत अधिक माहिती समोर येणे बाकी आहे.

Views: 108

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick