आर्थिक परिस्थितीमुळे मुलीला सोडल्याची पालकांची कबुली; तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल.
तळेगाव : देहूजवळील भंडारा डोंगरावर ६ सप्टेंबर रोजी एकटी आढळून आलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मुलीचा सांभाळ करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने तिला एखाद्या चांगल्या कुटुंबाचा आधार मिळेल, या अपेक्षेने डोंगरावर सोडल्याची कबुली तिच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे दिली आहे.
चिमुकली भंडारा डोंगरावर एकटी आढळल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. एवढ्या लहान मुलीला डोंगरावर कोणी आणून सोडले, ती हरवली आहे की तिच्यामागे अपहरणाचा काही प्रकार आहे, याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू झाले होते. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून मुलीच्या पालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी चिमुकलीला ताब्यात घेतल्यानंतर पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयाच्या बालरोग विभागात दाखल केले. तिची अवस्था पाहून डॉक्टर आणि पोलिस कर्मचारीही भावूक झाले. मुलीच्या पालकांचा शोध लागावा, यासाठी डॉ. प्रकाश कोयाडे यांनी सोशल मीडियावर भावनिक आवाहन केले. ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांच्या तपासालाही मदत झाली.
तपास सुरू असतानाच चिमुकलीचे आई-वडील सोमवारी सायंकाळी स्वतःहून तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाले. सुरुवातीला मुलगी मुंबईत सापडल्याचे सांगून वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र चौकशीदरम्यान पोलिसांनी अधिक माहिती घेतल्यानंतर अखेर मुलीला भंडारा डोंगरावर सोडल्याची कबुली पालकांनी दिली.
या प्रकरणी अजय शिवशंकर यादव (२३) आणि खुशबू अजय यादव (२२, दोघे रा. वासुली, मूळ उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय हा मजुरीचे काम करतो, तर खुशबू गृहिणी आहे.
मुलीचा सांभाळ करण्यासाठी आवश्यक आर्थिक परिस्थिती नसल्याने हा निर्णय घेतल्याचे पालकांनी पोलिसांना सांगितले. मुलीला एखाद्या चांगल्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा आधार मिळेल आणि तिचे संगोपन योग्य पद्धतीने होईल, अशी त्यांची अपेक्षा होती, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.
दरम्यान, चिमुकली सध्या वायसीएम रुग्णालयात सुरक्षित असून तिच्यावर वैद्यकीय तपासणी सुरू आहे. डीएनए तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. मुलीला बालगृहात दाखल करण्याची प्रक्रिया त्यानंतर केली जाणार आहे. या घटनेमागे आर्थिक अडचणींशिवाय अन्य काही कारण आहे का, याचाही तपास तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे.

















