भाजे ग्रामपंचायतीत मोठी उलथापालथ; सरपंच, उपसरपंचासह सहा सदस्य अपात्र..

कर थकबाकीच्या प्रकरणात अतिरिक्त विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय; ग्रामपंचायत राजकारणात खळबळ..

मावळ : भाजे ग्रामपंचायतीच्या राजकारणाला मोठा धक्का बसला असून, सरपंच, उपसरपंचासह तब्बल सहा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. ग्रामपंचायत कराच्या थकबाकीशी संबंधित प्रकरणात अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजे ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कर विहित मुदतीत न भरल्याचा मुद्दा उपस्थित करत याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विवाद अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर संबंधित अर्ज फेटाळण्यात आला होता.

या निर्णयाविरोधात अर्जदारांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे अपील दाखल केले. या अपिलावर सुनावणी झाल्यानंतर २ सप्टेंबर २०२६ रोजी अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी सहा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश दिला.

अपात्र ठरलेल्या सदस्यांमध्ये सरपंच प्रिया अमित ओव्हाळ, उपसरपंच कोमल किरण केदारी, तसेच विकास बबन वाल्हेकर, प्रमोद विजय ढगे, सारिका विश्वनाथ पदमुले आणि कविता अशोक चौरे यांचा समावेश आहे.

या निर्णयामुळे भाजे ग्रामपंचायतीतील सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, आगामी काळात ग्रामपंचायतीचे कामकाज आणि पदाधिकाऱ्यांची निवड याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या या निर्णयामुळे भाजे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या निर्णयानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया काय होते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Views: 131

Share this News on:

Related News

Recent News

Editor's Pick